नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ड्रोन उडवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ड्रोनचा वापर करण्यावर भारतात जे प्रतिबंध लावण्यात आले होते, ते शिथील करण्यात आल्याचे समोर आले आहे याव्यतिरिक्त काही नव्या अटीही लागू करण्यात आल्या आहेत. या अटींची पूर्तता केल्यानंतरच ड्रोनच्या उड्डाणाची परवानगी मिळणार आहे. अर्थात हे नियम व अटी पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला ड्रोन उडवता येणार आहे. भारत सरकारकडून सुरक्षेच्या कारणामुळे संवेदनशील परिसरात ड्रोन उडवण्यावर प्रतिबंध लावण्यात आले होते. परंतु आता काही नियम शिथील करत काही नवीन नियम व अटी डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हील एविएशनकडून(डीजीसीए) लागू करण्यात आल्या आहेत. भारतात आता 1 डिसेंबरपासून ड्रोनच्या उड्डाणावरील प्रतिबंध हटवण्यात आले आहे.
ड्रोनचे पाच प्रकार-
डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हील एविएशनने पाच भागात ड्रोनची विभागणी करत पाच प्रकार सांगण्यात आले आहेत. यातील पहिला प्रकार म्हणजे नॅनो ड्रोन. या ड्रोनचे वजन साधारणपणे अडीचशे ग्रॅम असते. दुसरा आहे मायक्रो ड्रोन. मायक्रो ड्रोनचे वजन साधारणपणे अडीचशे ग्रॅम ते 2 किलो पर्यंत असते. उर्वरीत तीन प्रकारात मोडणारे ड्रोन लहान,मध्यम, आणि मोठ्या साईजचे असतात. महत्त्वाचे म्हणजे या प्रकारातील ड्रोनचे वजन 2 किलो ते 150 किलो पर्यंत असते.
हे आहेत ड्रोन उडवण्यासाठीचे नियम-
1) जर तुमच्याकडे ड्रोन आहे, तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम DGCA ची परवानगी अवश्यक आहे. त्याशिवाय तुम्ही ड्रोन उडवू शकणार नाही.
2) भारतात आता 1 डिसेंबरपासून ड्रोनच्या उड्डाणावरील प्रतिबंध हटवण्यात आले आहे. मात्र त्यासाठी DGCA कडे काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. ड्रोनसाठी युनिक आयडेंटीफिकेशन नंबरची गरज लागणार आहे. त्यासाठी एअरक्राफ्ट ऑपरेटर परवाना घ्यावा लागेल.
3) ड्रोन ऑपरेटरने वयाची किमान 18 वर्षे पूर्ण केलेली असावीत
4) ड्रोनचा विमा उतरवलेला असावा. तसेच DGCAने ड्रोन उडवण्यासाठी वेळेची मर्यादा घालून दिली आहे. त्यावेळेतच ड्रोन उडवावे लागेल.
5) दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरु या शहरांतील विमानतळाच्या पाच किलोमीटरच्या परिघात ड्रोन उडवता येणार नाही. इतर शहरातील विमानतळाच्या परिसरात 3 किमी आत प्रतिबंध असणार आहे.
6) ड्रोन ऑपरेटरने इंग्रजी हा विषय घेऊन दहावी उत्तीर्ण केलेलं असावं. ड्रोन ऑपरेटिंगसाठी ट्रेनिंग प्राप्त केलेलं असावं.
7) अंतरराष्ट्रीय सीमेच्या 25 किमी जवळ ड्रोन उडवण्यास प्रतिबंध असेल.
8) तुमच्याकडे मायक्रो ड्रोन आहे आणि ते तुम्हाला 200 फुटांच्या खाली उडवायचे असेल, तर 24 तासापूर्वी त्याची माहिती पोलिसांना द्यावी लागणार. जर ड्रोन सरकारी एजन्सीचा असेल तर उडवण्यापूर्वी स्थानिक पोलीस स्थानकाला त्याची सूचना द्यावी लागणार.
9) ज्यांना ड्रोनचा वापर करायचा आहे त्यांना वरील सर्व नियम व अटींची पूर्तता करणे अनिवार्य आहे. या सर्व अटींची पूर्तता करणाऱ्यालाच DGCA कडून ड्रोन वापरासाठी परवाना देण्यात येईल. इतकेच नाही तर डीजीसीएच्या परवान्याची वैधता पाच वर्षांची असेल, दर पाच वर्षांनी या परवान्याचं नूतनीकरण करणं अनिवार्य असेल.