उघडया दरवाजावाटे आलेल्या मारेकर्याने गोळीबार करून महिलेचा खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास चंदननगर परिसरातील आनंद पार्क येथील इंद्रायणी गृहरचना सोसायटीमध्ये घडली. गोळीबारात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. चंदननगर पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असुन प्रकरणाची कसुन चौकशी करण्याचे काम चालु आहे.
एकता ब्रिजेश भाटी (38, रा. इंद्रायणी गृहरचना सोसायटी, आनंद पार्क, चंदननगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञात मारेकरी उघडया दरवाजावाटे घरात आला आणि त्याने एकता यांच्यावर गोळीबार केला अशी माहिती एकता यांचे पती ब्रिजेश यांनी पोलिसांना दिली आहे. गोळीबार झाल्याच्या आवाज आल्यानंतर सोसायटीमधील इतर रहिवाशांनी गर्दी केली. गोळीबार करून मारेकरी पसार झाल्याचे ब्रिजेश भाटी यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, खरच उघडया दरवाजावाटे मारेकरी आला होता का आणि त्याने एकता यांच्यावर गोळीबार केला का याचा सखोल तपास पोलिस करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासचे काम एक पथक करीत आहे. मारेकर्याचे वर्णन देखील सांगण्यात असमर्थ ठरलेल्या ब्रिजेश यांच्यावर पोलिस सखोल माहिती घेत आहेत. मात्र, सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास सोसायटीत येवुन गोळीबार करण्याचे कोणाचे धाडस होणार नाही, ओळखीच्याच कोणीतरी गोळीबार केला असावा असा तर्क काढला जात आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे. गोळीबारानंतर ब्रिजेश भाटी यांनीच एकता यांना रूग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. एकता यांच्या छातीत गोळी लागली होती. प्रकरणाचा सखोल तपास चालु असून अद्याप एकता यांच्यावर नेमका कोणी गोळीबार केला हे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालेले नाही. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्यासह इतर वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली.
कोंढवा परिसरातील येवलेवाडी येथे गणेश ज्वेलर्स नावाची सराफी पेढी आहे. नेहमीप्रमाणे दुकानासमोर वर्दळ होती. दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोराने गणेश ज्वेलर्समध्ये असलेल्या व्यक्तीवर गोळीबार केला. हल्लेखोराची गोळी लागल्यामुळे संबंधित व्यक्ती जखमी झाला असून त्यास तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येवलेवाडी येथे गोळीबार झाल्याची घटना समजताच वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. कोंढवा पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील आणि इतर अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली तर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक आयुक्त समीर शेख, दरोडा प्रतिबंधक पथकाचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कदम आणि इतर अधिकारी येवलेवाडीच्या दिशेने रवाना झाले आहेत. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिस अधिकार्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. हल्लेखोराने दरोडा टाकण्याच्या उद्देशाने गोळीबार केला अथवा इतर कोणत्या अन्य कारणावरून गोळीबार झाला हे अद्याप स्पष्ट होवु शकलेले नाही. सकाळी चंदननगर परिसरातील आनंद पार्क येथे गोळीबार करून एकता ब्रिजेश भाटी (38) या महिलेचा खून करण्यात आला होता. ती घटना होवुन काही तास झाले नाही तर पुण्यात दुसर्या ठिकाणी गोळीबार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दरोडा टाकण्यासाठी चार दरोडेखोर येवलेवाडी येथे आले होते. त्यांनी दरोडा टाकण्यासाठीच गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गोळीबार करून दरोडेखोर पसार झाले आहेत. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात गणेश ज्वेलर्समधील कामगार आम्रत परिहार (30) हा जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार चालु आहेत.
गोळीबाराची तिसरी घटना : पुणे रेल्वे स्टेशन
दिवसभरातील गोळीबाराची तिसरी घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेतील युनिट-2 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर दिवसाढवळया गोळीबार झाला आहे. पुणे रेल्वे स्टेशन परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे. जखमी झालेल्या वरिष्ठ पोलस निरीक्षक गजानन पवार यांना तात्काळ खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असुन त्यांच्यावर उपचार चालु आहेत.
बुधवारी सकाळी चंदननगर परिसरातील आनंद पार्क येथील इंद्रायणी गृहरचना सोसायटीमध्ये एका महिलेवर गोळीबार झाला होता. त्यामध्ये एकता ब्रिजेश भाटी (38) यांचा मृत्यू झाला. सकाळी सर्व वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, गुन्हे शाखेचे उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक आयुक्त समीर शेख, युनिट-2 चे पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संग्रहित करून त्याव्दारे आरोपींचा शोध चालु केला. दरम्यान, संशयितांची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. संशयित पुणे रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक गजानन पवार यांना समजले. त्यानंतर निरीक्षक पवार आणि त्यांच्या पथकातील पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचला. संशयित आरोपी त्यांच्या टप्प्यात देखील आले. त्याचवेळी संशयितांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. पुणे स्टेशन परिसरात भरदिवसा गोळीबार झाल्याने प्रचंड खळबळ उडाली. दरम्यान, पोलिस निरीक्षकावर गोळीबार झाल्याचे वृत्त शहरात सर्वत्र पसरले आणि प्रचंड खळबळ उडाली. पोलिस निरीक्षक पवार यांना रूबी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकावर गोळीबार झाल्याने संपुर्ण पुणे शहरात खळबळ उडाली असून पोलिस संशयित आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, पुणे स्टेशनवर प्रचंड गर्दी असल्याने तेथील नागरिकांमध्ये देखील खळबळ उडाली.