पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – आजपर्यंत इतर राजकीय नेत्यांनी आणि त्यांच्या पक्षांनी माझा केवळ वापर करून घेतला. सभे मध्ये गर्दी जमवण्यासाठी माझा वापर झाला आहे. असे पुणे जिल्हा येरवडा मध्यवर्ती कारागृह अभिविक्षक समितीचे माजी सदस्य भाजपचे कार्यकर्ते अनिल जाधव यांनी म्हंटले आहे. त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला. दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले.
आगामी निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असून, भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीतर्फे पिंपरी येथे सभा व महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, पुणे जिल्हा येरवडा मध्यवर्ती कारागृह अभिविक्षक समितीचे माजी सदस्य भाजपचे कार्यकर्ते अनिल जाधव यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला. त्यावेळी, आजपर्यंत इतर पक्षांनी माझा केवळ वापर करून घेतला. एखादी सभा होणार असेल तर गर्दी जमवण्याचे काम मला सांगण्यात येत होते. माझी ताकद नको त्याठिकाणी व्यर्थ जात होती. समाजातील वंचित वर्गासाठी प्रकाश आंबेडकर यांनी जो लढा पुकारला आहे त्याला प्रेरित होऊन मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी बाबासाहेबांना कधी पाहिले नव्हते, परंतू आज बाळासाहेबांच्या रूपात मला बाबासाहेबांचे दर्शन झाले आहे. येणार्या काळात नक्कीच वंचितांची ताकद काय असते ते दाखवून देऊ. असे वक्तव्य अनिल जाधव यांनी केले.
विशेष म्हणजे त्यावेळी, जाधव यांच्या सोबत महेंद्र आदियाल, अरूण चाबुकस्वार यांचा देखील प्रवेश झाला आहे. दरम्यान, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, भारिप प्रदेशाध्यक्ष अशोक सोनावणे, माजी आमदार लक्ष्मण माने, सचिन माळी, नवनाथ पडळकर, देवेंद्र तायडे, अकिल मुजावर आदी उपस्थित होते.