ठाणे : बहुजननामा ऑनलाईन – अंबरनाथमध्ये केंद्रीय मंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवले यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. रामदास आठवले हे कार्यक्रम आटोपल्यानंतर व्यासपीठावरून उतरत असताना एका तरुणाने त्यांना मारहाण केली. याप्रकरणी धक्काबुक्की करणाऱ्या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे.
अंबरनाथ येथील नेताजी मैदानावर ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’च्या वतीने संविधान गौरव महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आठवले उपस्थित होते. रात्री १० वाजता हा कार्यक्रम संपल्यानंतर ते व्यासपीठावरून खाली येत असताना प्रवीण गोसावी या तरुणाने त्यांच्या अंगावर धावून जात मारहाण केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने संतापलेल्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणास बेदम मारहाण केली. अंबरनाथ पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत या तरुणाला ताब्यात घेतले. जबर जखमी झाल्याने त्यास रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोसावी हा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता आहे. हल्ला झाल्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या तरूणाने धक्काबुक्की का केली? हे अद्याप समजू शकलेले नाही. अंबरनाथमध्ये या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या तरूणाने आठवलेंना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला. आठवले यांचे सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्ते यांनी या तरूणाला बाजूला खेचले. जे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले होते त्यांनी थेट चोप द्यायला सुरुवात केली. या सगळ्यामध्ये हल्ल्यामागचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. या घटनेचा तपास आता पोलीस करत आहेत.