परभणी : बहुजननामा ऑनलाइन – मराठा समाजातील युवकांना उद्योग व्यवसायासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यांची कर्जप्रकरणे नाकारली जात असून आडवणूक होत आहे. तालुक्यातील बँक अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचा वतीने सहाय्यक उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून कर्ज प्रकरणे तत्काळ मंजूर झाली नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यात क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले होते. यावेळी राज्य सरकारच्या वतीने आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून मराठा समाजातील तरूणांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी दहा लक्ष रुपयांपर्यंत कर्ज देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच वेळोवेळी बँक अधिकाऱ्यांच्या राज्य व जिल्हा स्तरावर बैठका घेऊन आदेश पण दिले होते. त्यामुळे तालुक्यातील मराठा समाजातील युवकांनी रितसर अर्ज करून विविध बँकांकडे कर्ज प्रकरणे दाखल केली आहेत; परंतु शहरातील व ग्रामीण भागातील बँक अधिकाऱ्यांकडून कोणतीही दखल घेतली नसून लाभार्थी दरवेळी बँकांकडे चकरा मारत आहेत. परंतु त्यांची कर्ज प्रकरणे मंजूर करण्यास बँक अधिकाऱ्यांनी टाळाटाळ चालविली आहे.
मराठा युवकांची कर्ज प्रकरणे तात्काळ मार्गी लावावीत व आडवणूक करणाऱ्यां संबंधित बँक अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्या वतीने सहाय्यक उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे.या निवेदनावर बालाजी शिंदे, बाळासाहेब काजळे, दीपक डोंबे, सुनील गाडेकर, सोपान धापसे, योगेश सडाळ, विनोद पिंगळे, विठ्ठल रोकडे, विजय भांबळे, रामचंद्र डोंबे, भास्कर शिंदे, बालाजी अंभुरे, कैलास अंभुरे, किशन देवकर, अमोल देवकर, गणेश जाधव, परमेश्वर पिंगळे, कुणाल देवकर, अनिल दाभाडे आदी संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.