नाशिक : बहुजननामा ऑनलाइन – शासनाच्या आडमुठ्या धोरणांमुळे नागरिकांना अनेक सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएमच्या माध्यमातून एकजुटीचा नारा देण्यासंदर्भात भारिप बहुजन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे राष्ट्रीय नेते ओसाउद्दीन ओवेसी यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. १३) नाशकात जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष पवन पवार, तसेच माजी नगरसेवक संजय साबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही प्रमुख नेते आपल्या विशेष शैलीत संबोधणार असल्याची, तसेच आगामी निवडणुकांच्या दृष्टीने रणनीती आखण्यासाठी हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची माहिती देण्यात आली.
प्रकाश आंबेडकर संपूर्ण राज्यभरात मेळावे घेत असून, वंचितांच्या समस्या जाणून घेत आहेत. या मेळाव्याअंतर्गत आरक्षण, पाणी प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न यासह विविध प्रश्नांवर चर्चा होत असतानाच मुस्लीम आरक्षणासाठीही आग्रही भूमिका घेतली जात असल्याने नाशिकमध्ये होणाऱ्या मेळाव्यातदेखील या समस्यांचा उहापोह होऊन याबाबतची भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याने या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गोल्फ क्लब मैदान येथे रविवारी (दि. १३) दुपारी चार वाजता होणाऱ्या या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन धनगर समाजाचे नेते विनायक काळदाते, संघटनेचे संघटक दीपचंद दोंदे, महासचिव संतोष सरकटे, जिल्हा सचिव बाळासाहेब जाधव, एमआयएमचे कोषाध्यक्ष मुक्तार शेख, मध्य विधानसभा अध्यक्ष रमझान पठाण, देवळाली विधानसभा अध्यक्ष सत्तार तांबोळी, पश्चिम विधानसभा अध्यक्ष अश्फाक सय्यद आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे.