ओबीसी-व्हीजेएनटी नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मराठा समाजाला ओबीसी वर्गातील आरक्षण देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध राहील, याचबरोबर राज्य मागास आयोग वर्गाने राज्य सरकारकडे सादर केलेला गायकवाड अहवाल माहिती अधिकारातून मागवून घेऊन त्याचा अभ्यास करून ठोस भूमिका घेऊ असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ओबीसी नेत्यांना दिले आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला एसईबीसी वर्गातील आरक्षण दिल्याने ओबीसी-व्हीजेएनटी नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली दरम्यान त्यांनी हे आश्वासन दिले.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ओबीसी-व्हीजेएनटी नेत्यांनी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. दरम्यान त्यांना ओबीसी आरक्षण वाचविण्याची विनंती केली. त्यावेळी, राज्य सरकारने कोर्टात राज्य मागास आयोगाचा अहवाल स्वीकारला नाही असे लिहून दिले आहे पण त्यांच्या काही अटी स्वीकारत असल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून दिल्याचे शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान शरद पवार यांनी मी स्वत: राज्य मागास आयोगाने सादर केलेला गायकवाड अहवाल माहिती अधिकारातून मागितला आहे. तो अहवाल मला मिळताच त्याचा अभ्यास करू याबाबत ठोस भूमिका घेऊ तसेच मराठा समाजाला ओबीसी वर्गातील आरक्षण देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध राहील. असे शरद पवार यांनी म्हंटले.
विशेष म्हणजे, ओबीसी नेत्यांनी, राज्यातील फडणवीस सरकारने आरक्षणाचा खेळखंडोबा केला आहे. ओबीसी वर्गातील छोट्या छोट्या जातीवर अन्याय करत मराठा समाजाला एसईबीसी वर्गात टाकून १६ टक्के आरक्षण दिले आहे. मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण देण्याचे मान्य केले होते. परंतु, सरकारने राज्य मागास आयोगाच्या अहवालानुसार एसईबीसीमध्ये आरक्षण दिले आहे. त्यामुळे ओबीसी, व्हीजेएनटी समाजात असुरक्षितचेची भावना आहे. न्यायालयातही सरकारने ओबीसी आरक्षणाविरोधात भूमिका मांडली आहे. कोर्टात योग्य भूमिका न मांडल्याने ओबीसी वर्गाचा सरकारने विश्वासघात केला आहे. त्यामुळे त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे हे सरकार बरखास्त करावे अशी मागणी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली होती.
या बैठकीला प्रकाश शेंडगे, हरिभाऊ राठोड, रामराव वडकुते, टीपी मुंडे, श्रावण देवरे, जे डी तांडेल, अॅड.मंगेश ससाणे, अनिल खरमाटे, मंगेश सोळंकी, प्रतिक गोसावी, कमलाकर दरोडे, बालाजी शिंदे, मृणाल ढोले- पाटील यांच्यासह ओबीसी-एनटी समाजातील नेते यावेळी उपस्थित होते.
ओबीसी- व्हीजेएनटी नेत्यांची शरद पवार यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधतांना ओबीसी व्हीजेएनटी प्रवर्गात मराठा समाजाला आरक्षण दिल्याने याविरोधात ओबीसी व भटक्या विमुक्त समाज येत्या २७ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार आहे. २७ जानेवारीला कोल्हापूरात ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष यात्रेचा प्रारंभ होईल तर २५ फेब्रुवारीला ही यात्रा विधीमंडळ अधिवेशनाच्या काळात मुंबईतील आझाद मैदानात धडकेल. आझाद मैदानात राज्यातील १० लाख ओबीसी बांधवांना जमवून सरकारला इशारा देणार असल्याचे शेंडगे यांनी सांगितले. ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष यात्रा कोल्हापूर, सोलापूर, लातूर, ओरंगाबाद, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूरसह राज्याती प्रमुख शहरात, जिल्ह्यात जाईल व सरकारविरोधात रान पेटविणार असल्याचे प्रकाश शेंडगे यांनी यांनी सांगितले.