वर्धा : बहुजननामा ऑनलाइन – भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ग्रंथालयातील पुस्तके वाचून जगातील एक विद्वान व्यक्ती म्हणून स्वत:ला सिद्ध केले. त्याप्रमाणे आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी युवकांनी सार्वजनिक वाचनालयातील पुस्तकांचे स्वत:ला पंख लावून प्रगती साधावी, असे सांगून सार्वजनिक वाचनालये नवसमाजाचे शिल्पकार घडविणारे केंद्र आहे, असे मत आ. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले. ते भिडी येथील संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालयाच्या इमारतीचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
उद्घाटन खा. रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रंथपाल अस्मिता मंडपे, ग्रंथालय अधिकारी विभा डांगे, ग्रंथपाल संघाचे कार्यवाह डॉ. गजानन कोटेवार, वाचनालयाचे अध्यक्ष अरुण हर्षबोधी, पं.स.सदस्य शंकर उईके, सरपंच नारायण देवतळे, उपसरपंच नितीन दिघाडे, मुख्याध्यापक विलास येंडे, मुख्याध्यापक अनिल डांगे, सुधीर गवई, माजी सरपंच डॉ. प्रकाश काळे, माजी पं.स.सदस्या ज्योती काळे, प्रा. सचिन सावरकर, डॉ. वासुदेव भगत, मुख्याध्यापिका आटे, विशाखा फुलमाळी, माजी सरपंच कांता देवघरे, दादाराव मून, प्रा. मनोहर लांडगे, प्रकाश हेंडवे, प्रशांत साठे,विलास भगत, राजेंद्र ताजणे आदींची उपस्थिती होती.
या वाचनालयाची नवीन इमारत राजा राममोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांचे विशेष योजनेतील दहा लाख तसेच अध्यक्ष अरुण हर्षबोधी यांनी सहा लाख असे १६ लाख रुपये खर्चून बांधण्यात आली आहे. त्याबद्दल अरुण हर्षबोधी व अश्विनी हर्षबोधी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ख. रामदास तडस यांनी अभ्यासिका निर्माण करण्यासाठी पाच लाखांचा निधी जाहीर केला. प्रा. कवाडे यांनी अवश्यक संसाधने पुरविण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश हेंडवे यांनी केले. आभार प्रशांत साठे यांनी मानले. यशस्वीतेकरिता गजू फाळे, सचिन बिरे, अजय झाडे, विठ्ठल भगत, देवेंद्र वाघमारे, सचिन इंगोले, अगम, हेंडवे आदिंनी सहकार्य केले.