परभणी : बहुजननामा ऑनलाइन – धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊन अनुसूचित जमातीच्या सवलतींची अंमलबजावणी तात्काळ करावी यासाठी २० जानेवारी रोजी वाशीम येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय आक्रोश आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खा. डॉ. विकास महात्मे यांनी केले.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित धनगर आक्रोश आंदोलनाच्या बैठकीत मार्गदर्शक म्हणून बोलत ते होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रभाकर वजीर गणपूरकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष बापुसाहेब शिंदे, धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेश सचिव हरिष खुजे, माजी सभापती गणेश घोरपडे, अनंत कोरडे, दीपक शेंद्रे, कुबेर हुलगुंडे, अर्जून वजीर, भगवान गायकवाड, सरपंच मधुकर कुकडे, सुरेश कानडे, रंगनाथ काळदाते आदी उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे आयोजन जिंतूर धनगर संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी सुरेश भुमरे, प्रभाकर वजीर यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अनंत बनसोडे यांनी केले तर आभार कुबेर हुलगुंडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माणिकराव खुलासे, भागुजी कुकडे, रामराव राठोड, कृष्णा कुकडे, नागेश कुकडे साहेबराव चव्हाण, अच्युतराव येवले, यांचेसह धनगर आरक्षण संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.