मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – एका बाजूला तीन तलाकमुळे देशात वातावरण तापलेले असताना समाजवादी पक्षाने वेगळीच मागणी करून पालिकेत धार्मिक वाद निर्माण केला आहे. पालिकेच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करताना मुस्लिम रुग्णांची दाढी काढू नका किंवा दाढी काढायचीच असेल तर नातेवाईकांची परवानगी घ्यावी अशी मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केली आहे. तसे पत्र त्यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाला लिहिले आहे.
समाजवादी पक्षाचे महापालिकेतील गटनेते रईस शेख यांनी महापालिकेचे उपायुक्त संजय धामणे यांना या मागणीचे पत्र दिले. दाढी ठेवणे ही मुस्लिम धर्माची परंपरा आहे. महापालिका रुग्णालयात लहान शस्त्रक्रियेच्या वेळीही चेहऱ्यावरील केस काढले जातात. दाढी काढून टाकलेला मुस्लिम रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांना समाजात वावरताना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रुग्ण किंवा त्याच्या कुटुंबीयांची परवानगी घेऊनच दाढी काढावी, अशी मागणी शेख यांनी केली आहे.
दाढीमुळे शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णाला संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणत्याही शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णालयात दाढी काढण्याची सूचना केली जाते; मात्र सक्ती केली जात नाही, अशी माहिती महापालिका रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टराने दिली. हृदय, चेहरा आणि डोळ्यांच्या शस्त्रक्रियेवेळी दाढी काढणे आवश्यक असते, असेही त्याने सांगितले.