बहुजननामा ऑनलाइन टीम – जपानच्या पंतप्रधानपदावरून शिंजो आबे पायउतार झाले असून, लवकरच योशिहिदे सुगा यांच्या खांद्यावर ही जबाबदारी येणार आहे. सुगा सध्या जपान सरकारमध्ये मुख्य कॅबिनेट सचिव आहेत. ते शिंजो आबे यांचे विश्वासू आहेत. आबेंचा वरदहस्त असल्यानं नवीन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सुगा यांचं नाव आघाडीवर होते. अखेर त्यांनाच जपानचे पंतप्रधानपद भूषवण्याचा बहुमान मिळणार आहे. शिंझो आबे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्यानं जपानमधील नवी पंतप्रधानांचा शोध सुरु झाला होता.
सत्तारुढ लिबरल डेमोक्रेटिक पक्षाच्या नेतेपदाच्या निवडणुकीत सुगा यांनी दणदणीत विजय मिळवला. सुगा यांना 377 तर इतर दोन उमेदवारांना एकूण 157 मते मिळाली. योशिदे हे आबे यांचे दीर्घ काळापासून सहाय्यक होते. सुगा हे पक्षातील कोणत्याही गटाशी संबंधित नाहीत. त्याशिवाय आबे यांच्या धोरणाला पुढे नेण्यासाठी त्यांचा योग्य पर्याय असल्याची चर्चा आहे. सध्या जपानसमोर कोरोनाचे संकट, अमेरिकेसोबत संरक्षण क्षेत्रातील संबंध आणि ढासळती अर्थव्यवस्था सावरण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. योशिदे सुगा हे दीर्घ काळापासून कॅबिनेट सचिव म्हणून कार्यरत होते. पंतप्रधान आबे यांचे सल्लागार आणि समन्वयक म्हणूण कार्यरत राहिले आहेत.
शिंजो आबे हे आतड्यासंबंधीच्या आजाराने ग्रस्त आहेत. मागील काही महिन्यांपासून त्यांच्या या आजाराने पुन्हा उचल खाल्ली. उपचाराअभावी पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळता येणार नसल्याने त्यांनी जनतेची माफी मागत राजीनाम्याची घोषणा केली. ऑगस्टच्या उत्तरार्धात त्यांनी पंतप्रधानपदाची खुर्ची सोडण्याची घोषणा केली होती. आबे यांनी पद सोडत असल्याची अचानक घोषणा केल्यानंतर आशियातील बलाढ्य देशांत खळबळ उडाली होती. या घोषणेचा परिणाम संपूर्ण जगावर दिसून आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिंजो आबे यांना खाजगीत बोलावून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.