पुणे बहुजननामा ऑनलाईन – सात ते आठ वर्षांपासून असलेल्या नात्यात ब्रेक अप झाल्यानंतर तरुणीला लग्नाची मागणी केली. त्यानंतर तिचा पाठलाग करून तिचे रिक्षातून अपहरण केले. अपहरण करून तिला लग्नाची मागणी केल्यावर तिने नकार दिला. या रागातून तरुणीला चाकूने भोसकून तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यात समोर आली आहे. याप्रकऱणी मुंढवा पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर तरुणीवर उपचार सुरु आहेत. प्रसाद रमेश सोनवणे, नदीम शेख, चंदन चव्हांडके (रा. कोंढवा ) अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याप्रकरणी २५ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.
नुकतेच झाले ब्रेकअप
फिर्यादी तरुणी ही मुंढवा येथे राहते. ती २०११ मध्ये रामटेकडी येथे राहण्यास असताना तिच्या घरासमोर राहणारा प्रसाद सोनवणे याच्याशी तिची ओळख झाली. त्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांचे सुमारे ७-८ वर्षे प्रेमसंबंध होते. त्यानंतर मागील चार ते पाच महिन्यांपासून प्रसाद सोनवणे तिला वारंवार किरकोळ कारणावरून दारू पिऊन मारहाण करत होता. त्यामुळे तिने त्याच्य़ाशी असलेले संबंध तोडले. त्यानंतर तो तिला पाठलाग करून, तसेच मित्रांच्या मोबाईलवरून फोन करून त्रास देत होता. त्यामुळे ती त्याला काहीच प्रतिसाद देत नव्हती.
रिक्षातून अपहरण
गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास संबंधीत तरुणी कामावरून घरी जाण्यासाठी बाहेर पडली. त्यावेळी प्रसाद हा त्याच्या दोन मित्रांसह नदीम शेख आणि चंदन चव्हांडके यांना घेऊन आला. तिला बळजबरीने सोबत आणलेल्या रिक्षात बसवले. त्यानंतर तिला मगरपट्टा सिटीमध्ये नेले. रिक्षात बसल्यावर तो तिला वारंवार माझ्याशी लग्न कर म्हणू लागला. परंतु ती त्याला सतत नकार देत होती. त्यामुळे तिला तू माझ्या घरी चल, हे माझ्या घरच्यांना सांग असे म्हणून त्याने तिला बळजबरीने तिला त्याच्या घरी नेत असताना तिला भावाचा फोन आला. भावाला तिने घडला प्रकार सांगितला.
त्यानंतर प्रसाद आणि त्याच्या मित्रांनी तिला घरी नेत असताना हडपसर इंडस्ट्रीय एरीयामधील पावर हाऊसजवळ तिला घेऊन गेला. त्यानंतर त्याच्याकडील चाकू काढून प्रसादने तिला माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय बदल नाही तर तुला जीवे मारीन अशी धमकी दिली. तरीही तिने न घाबरता नकार दिला. त्यानंतर त्याने तिला शिवीगाळ करत छातीवर उजव्या बाजूला चाकूने भोसकले. तसेच पाठीवर भोसकून तिच्या उजव्या हाताच्या बोटावर चाकूने वार केला.
यानंतर तरुणीने त्याला लग्नाला होकार दिला. मला मारू नको अशी विनवणी केली. त्यानंतर तो ८ च्या सुमारास तिला घरी घेऊन गेला. घरी गेल्यावर तिला तिच्या बहिणीचा फोन आला. त्यावेळी प्रसादची आई तिच्याशी बोलली. तिने सांगितले की, तिला मार लागला आहे. तिला दवाखान्यात नेत आहोत. या काळात मोठ्या बहिणीचा फोन आल्यावर संबंधित तरुणीने तिला सर्व प्रकार सांगितला. तिची मोठी बहिण प्रसादच्या घरी आली. त्यानंतर तिने तरुणीला हडपसर पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी उपचारासाठी तिला रुग्णालयात पाठवून दिले.