कोल्हापूर बहुजननामा ऑनलाईन – राज्यात पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूरमध्ये लाखो लोक पूराच्या पाण्यात अडकले आहेत. लोकांच्या डोळ्यातही दु:खाचा महापूर आहे. परंतु कोल्हापूर येथे पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मात्र पूर पर्यटन करण्यात मश्गूल आहेत. आढावा घेण्यासाठी गेलेले मंत्री सेल्फी व्हिडीओला हसून दाद देताना दिसत आहेत. त्यामुळे एकीकडे महापूरात अडकलेल्या लोकांच्या डोळे ओले असताना मंत्री मात्र आनंदात असल्याचं वास्तव समोर आलं आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन गुरुवारी कोल्हापूरातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी बोटीतून ते निघाले असताना कार्यकर्त्याने त्यांचा सेल्फी व्हिडीओ तयार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी महाजनांनी त्याला हसून दाद दिली. कदाचित मंत्री महोदय इथे पोहोचलेत हे सांगण्यासाठी कार्यकर्ता सेल्फी घेत होते असे दिसते. परंतु मंत्रिमहोदयच या व्हीडीओत हसून दाद देत असल्याने ते नेमके पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते की पूर पर्यटनासाठी आले होते. या शंकेला वाव उरतो अशी टीका सर्व स्तरातून त्यांच्यावर होत आहे. याच परिस्थितीचं गांभीर्य मात्र कोणालाही नाही. अशी टीका विरोधकांनी केली आहे.
यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्वीट केले आहे की, सत्ताधाऱ्यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठला आहे. लेकराच्या मृतदेहाचे छायाचित्र आठवले तर मनाला चटका लागून डोळ्यात टचकन पाणी येतं मात्र मंत्री महोदय मात्र सेल्फीत मग्न आहेत. लाज कशी वाटत नाही ? या असंवेदनशील वागण्याची दखल घेणार का ?
महापूर पाहणीवेळी मंत्री @girishdmahajan आणि अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू, सेल्फीसाठी पोझ. पुराची पाहणी करण्यासाठी गेले आहेत की पर्यटनासाठी? सत्ताधाऱ्यांना काही संवेदना उरल्या आहेत की नाही? @Dev_Fadnavis जी, या असंवेदनशील मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्या,अधिकाऱ्यांचे निलंबन करा. pic.twitter.com/7wM0a2bE5m
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 9, 2019
सत्ताधाऱ्यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठलाय! ‘त्या’ लेकराच्या मृतदेहाचे चित्र आठवले तर मनाला चटका लागून डोळ्यात टचकन पाणी येतं. मंत्री महोदय @girishdmahajan मात्र सेल्फीत मग्न आहेत. लाज कशी वाटतं नाही? @CMOMaharashtra या असंवेदनशील वागण्याची दखल घेणार का?#maharashtrafloods pic.twitter.com/1tDxo91gJg
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 9, 2019