बहुजननामा ऑनलाईन – लातूर तालुक्यातील मौजे वांजरखेडा तांडा येथे एका महिलेचे नवऱ्याच्या भाच्यासोबत असलेल्या अनैतिक संबंधात नवऱ्याचा अडथळा होतोय म्हणून चक्क भाच्याच्या मदतीने नवऱ्याचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गातेगाव पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या खूनप्रकरणी मृताचा भाऊ रंगनाथ धनसिंग उर्फ धेनू चव्हाण यांनी पोलिसात तक्रार केली आहे. रंगनाथचा भाऊ वैजनाथ हा पत्नी संगीतासोबत वेगळा राहत होता. वैजनाथला त्याची पत्नी नेहमीच मारहाण करत त्रास देत असे. तसेच संगीताचे वैजनाथचा भाचा मारुती नामदेव शिंदे याच्यासोबत अनैतिक संबंध होते.
यावरून वैजनाथ आणि संगीतामध्ये नेहमी भांडण होत असे. वैजनाथ याचा मृतदेह वांजरखेडा तांडापासून एक कि. मी. अंतरावर जवळ बु. शिवारातील पाण्याच्या वॉलच्या खड्ड्यात सापडला होता. वैजनाथ चव्हाण याचा अनैतिक संबंधात अडथळा असल्याने त्याची पत्नी संगीत आणि भाचा मारुती यांनी वैजनाथ याला मारहाण करून त्याचा खून केल्याची तक्रार रंगनाथ यांनी दिल्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.