बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली: कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यात पुन्हा एकदा जगभरातील अनेक देशांमध्ये दुसरी लाट आली आहे. त्या देशांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउन (lockdown) करण्याची वेळ ओढवली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा घट्ट होतो की काय याची चिंता भेडसावत आहे. यावर(WHO ) मात करण्यासाठी सर्वजण चांगल्या लशीच्या प्रतीक्षेत आहेत, जी प्रभावी आणि परिणामकारक असेल. कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताकडून मिळणार पाठबळ आणि सहकार्य यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. ट्रेडोस एडनॉम गेब्रियेसस यांनी(WHO ) पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि WHO चे प्रमुख यांच्यात फोनवरून चर्चा झाली. त्यावेळी कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी भारताकडून भागीदारी दर्शवण्याबाबतदेखील चर्चा केली. तसेच पारंपरिक औषधांचा समावेशदेखील यात करण्याबाबत चर्चा झाली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताने जागतिक पातळीवर जी भागीदारी आणि समन्वय दाखवले त्यासाठी WHO च्या प्रमुखांनी पंतप्रधान मोदींचे कौतुकदेखील केले आहे.
कोरोनाच नाही तर इतर साथीच्या आणि मोठ्या रोगांकडेही दुर्लक्ष करू नये, तसेच विकसनशील देशांमध्ये आरोग्य यंत्रणेला दिलेल्या पाठिंब्याचे महत्त्वही सांगण्यात आले आहे. यावेळी WHO च्या प्रमुखांनी संघटना आणि भारतीय आरोग्य प्राधिकरण यांच्यातील जवळच्या आणि नियमित भागीदारीवर जोर दिला आणि आयुष्मान भारत आणि क्षयरोग (टीबी) विरुद्ध मोहिमेसारख्या देशांतर्गत उपक्रमांचेदेखील कौतुक केले आहे. अशा मोहिमांमध्ये भारताकडून महत्त्वाची भूमिका बजावली जात आहे. इतकच नाही तर कोरोनाविरुद्धचा लढाईमध्येदेखील भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या चर्चेदरम्यान 13 नोव्हेंबर हा दिवस कोरोनाविरुद्धच्या लढाईत आयुर्वेद दिन साजरा केला जाणार आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली आहे. पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या चर्चेनंतर WHO प्रमुख डॉ. ट्रेडोस एडनॉम गेब्रियेसस यांनी ट्विट करून मोदींचे आभार मानले आहेत.