मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata ) यांचे नाव जगभरात आदराने घेतले जाते. कायद्याचे काटेकोरपणे पालन करणे, संकटकाळात देशाच्या मदतीला धावून जाणारे उद्योगपती म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. असे उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata ) यांच्या नावावर असलेल्या आलिशान कारवर वाहतूक नियम मोडल्याचे एक ई चलन पाठविण्यात आले. त्यातून एकच खळबळ उडाली. स्वत: रतन टाटा (Ratan Tata ) यांना आपल्याला ई चलन आल्याचे समजल्याने ते अस्वस्थ झाले. त्यातून शोध सुरु झाला. तेव्हा असे आढळून आले की रतन टाटा (Ratan Tata ) यांच्याच गाडीच्या क्रमांकाची नंबरप्लेट वापरुन एक महिला दुसरी तशीच गाडी चालवत होती.
वाहतूक पोलिसांकडून या वाहनाचा तपास सुरु करण्यात आल्यावर प्रत्यक्षात टाटा यांच्या गाडीपेक्षा ही गाडी वेगळी असल्याचे दिसून आले. त्यातून मग मुंबई शहरामध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याचा वापर करुन पोलिसांचा शोध सुरु झाला. शोधाअंती हे वाहन नरेंद्र फॉर्वड्रेस प्रा़ लि़ यांच्या मालकीची ती गाडी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी नरेंद्र फॉर्वड्रेस प्रा़ लि़ च्या संचालिकेविरुद्ध बनावट नंबरप्लेटचा वापर करुन कायद्याचा भंग केल्याचा गुन्हा माटुंगा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.
उद्योगपती रतन टाटा यांच्या मोटार वाहनावरील चुकीचे झालेले ई चलन हे आरोपी महिलेच्या वाहनावर वर्ग करण्यात आले. पोलिसांनी बनावट नंबरप्लेट का वापरता अशी चौकशी केल्यावर या महिलेला आपण उद्योगपती रतन टाटा यांच्या गाडीचा नंबर वापर असल्याची कल्पनाच नव्हती. तिने अंकशास्त्राचा फायदा घेण्यासाठी मुळ नंबरप्लेटमध्ये बदल करुन बनावट नंबरप्लेटचा वापर करत होती, असे दिसून आले. वाहतूक शाखेचे सह पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल काळे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप फणसे, हवालदार अजीज शेख यांना या कामगिरीबद्दल रोख ५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.