बहुजननामा ऑनलाइन टीम – नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर(Devendra Fadnavis) आले. यावेळी अजितदादा तुम्ही मला एकतर चहाला बोलवा किंवा तुम्हीच आमच्याकडे या, अशी ऑफर देवेंद्र फडणवीस यांनी व्यासपीठावरून अजित पवार यांना दिली. पुणे महापालिकेच्या भामा आसखेड प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आज महापालिकेच्या सभागृहात ऑनलाईन पद्धतीने अजित पवार आणि दवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी दोन्ही नेत्यांनी आपल्या शैलीत जोरदार टोलेबाजी केली.
पुणेकरांना या कार्यक्रमाची जेवढी उत्कंठा नव्हती, तेवढी मिडियाला होती. दोन दिवसांपासून अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर येणार म्हणून बातम्या ऐकायला मिळत होत्या. आता मी आणि दादा एकत्र येणार असलो की दोन दिवस बातम्या चालतात. आता आम्ही काय कुस्ती करणार की गाणे गाणार होतो. त्यामुळे अजितदादांनी एकतर माझ्याकडे चहाला यावे किंवा मला तुमच्याकडे बोलवावे, मीडियाला बातम्याच बातम्या मिळतील असा टोला फडणवीस यांनी यावेळी लगावला.
फडणवीस पुढे म्हणाले, पुणे महापालिकेच्या भामा आसखेड प्रकल्पाची पुणेकरांना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भेट मिळाली आहे. या प्रकल्पाच्या प्रश्नांसाठी गिरीश बापट यांनी वेळोवेळी बैठका घेतल्या होत्या. पालिकेकडूनही चांगली योजना निर्माण झाली. येथून पुढे पुण्याच्या प्रश्नांसाठी काही अडचण जरी आली तरी तिजोरीच्या चाव्या या अजित पवार यांच्याकडेच आहेत. त्यामुळे कुठे कमी पडणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.