बहुजननामा ऑनलाइन टीम – राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy chief minister Ajit Pawar) कोरोनावर मात (Corona Checkmate) करून पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. अजितदादांनी मंगळवारी (दि. 10) मंत्रालयातून कामाला सुरुवात केली आहे. नेहमीप्रमाणे ते मंत्रालयातील आपल्या दालनात दाखल झाले. हातात ग्लोज आणि तोंडावर मास्क बांधून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. त्यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी थेट मंत्रालयातून एक व्हिडिओ लाइव्ह केला आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. 2 नोव्हेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज दिले होते. अखेर आठ दिवस घरीच विश्रांती घेतल्यानंतर ते पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. यावेळी खा. सुळे यांनी अजितदादा काम करत असतानाचा एक व्हिडिओ फेसबुकवर लाइव्ह केला आहे. व्हिडिओत सुळे यांनी अजितदादांना जाऊन एक निवेदन दिले आहे. पण, जेव्हा अजितदादांनी सही करण्यासाठी पेन मागितला तेव्हा सुप्रिया सुळेंनी आपल्याकडील पेन दिला. त्यावेळी माझ्या पेनमध्ये सॅनिटाझर आहे, असे सांगत अजितदादांची चेष्टा केली. तसेच डॉक्टरांनी काम करण्यास सांगितले का? असे सुप्रिया सुळेंनी विचारले असता, अजितदादा म्हणाले की, आज मंत्रालयात काम करणार आहे. नंतर पुण्याला जाणार आहे आणि तिथून बारामतीला जाणार असल्याचे ते म्हणाले.