अकोला बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकीसाठी कॉंग्रेससोबत आघाडीसाठी वाट न पाहता वंचितने स्वबळाची तयारी सुरु केली आङे. वंचित बहजुन आघाड़ीने मागील तीन दिवसात विदर्भातील वेगवेगळ्या मतदारसंघांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यात जवळपास १०० हून अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. मात्र वंचितकडे वाढणारी ही गर्दी पाहता कॉंग्रेसला याचा फटका नक्की बसणार आहे.
लोकसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीने सर्व शक्तीनीशी ४८ जागांवर आपले उमेदवार उभे केले. त्यावेळी कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत वंचितची आघाडी झाली नव्हती. परंतु त्यानंतर लोकसभा निवडणूकीत वंचितला मोठ्या प्रमाणात मतं मिळाली. त्यात वंचित बहुजन आघाडीने ४० लाखांहून अधिक मतदान पदरात पाडले. त्यामुळे याचा फटका कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बसला. त्यामुळे कॉंग्रेसने वंचितला बरोबर घेण्याची भुमीका घेतली आहे. परंतु अद्याप तरी आमच्याकडे कॉंग्रेसचा कुठलाही प्रस्ताव आलेला नसल्याचे सांगत वंचितने कॉंग्रेसलाच ४० जागांची ऑफर दिली आहे. तरीही कॉंग्रेसकडून कोणीही अद्याप तरी समोर आलेले नाही.
त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून कॉंग्रेसची वाट न पाहता राज्यभरात २८८ उमेदवार उभे करण्याची भूमीका घेण्यात आली आहे. त्यादृष्टीने वंचित बहुजन आघाडीने आता तयारीही सुरु केली आहे. विदर्भातील काही मतदारसंघांसाठी काल वंचितच्या संसदिय मंडळाने मुलाखती घेतल्या. त्यावेळी नागपूर विभागातील ११० इच्छुकांनी मुलाखती दिल्या. पक्षाच्या संसदीय मंडळाचे सदस्य अण्णाराव पाटील, प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे, आणि रेखा ठाकूर यांनी या मुलाखती घेतल्या. वंचितच्या लोकसभेतील कामगिरीमुळे अनेकांना वंचित बहुजन आघाडीने आकर्षित केले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबतच इतर पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी व नेत्यांनी मुलाखती दिल्या आहेत.