मुंबई बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद गोविंदराव येवले यांची औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती चे. विद्यासागर राव यांनी आज डॉ. प्रमोद येवले यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी अथवा ते वयाची 65 वर्षे पूर्ण करतील, यापैकी जे अगोदर असेल, त्या दिवसापर्यंत करण्यात आली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ बी. ए. चोपडे यांचा कार्यकाळ ३ जून २०१९ संपला. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. तोवर कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.
विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायमूर्ती अनिल दवे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित केली होती. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली या संस्थेचे संचालक प्रवीण कुमार तसेच शासनाचे प्रधान सचिव भूषण गगराणी हे या निवड समितीचे सदस्य होते.
कोण आहेत डॉ. येवले ?
डॉ. येवले यांनी औषधनिर्माणशात्र विषयात पीएचडी प्राप्त केलेली आहे. त्यांना अध्यापन, संशोधन व प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे. ते जून २०१५ पासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रकुलगुरु म्हणून नियुक्त करण्यात आले होते.