उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा कहर सुरु असतानाच उत्तर प्रदेशमध्ये प्रेम प्रकरणातून एका तरूणाला झाडाला बांधून पेटवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. त्या तरूणाचे नाव अंबिका पटेल आहे.
उत्तर प्रदेशमधील फतनपूर भागातील भुजौनी गावात सोमवारी रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडली. अंबिका आणि एका तरूणीचे प्रेमसंबंध होते. ही तरूणी पोलिस दलात भरती झाली. दोघांनाही लग्न करायचे ठरवले होते. त्याच दरम्यान अंबिकाच्या प्रेयसीची इतर ठिकाणी बदली झाली. तरीही दोघांमधील प्रेम कमी झाले नाही. मुलीच्या घरच्यांना ही बाब मान्य नव्हती. अशातच अंबिकाने सोशल मीडियावर प्रेयसीसोबतचा एक फोटो पोस्ट केला. मुलीच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार करताच अंबिकाला तात्काळ अटक करण्यात आली होती. एक मे रोजी त्याची पॅरोलवर सुटका झाली होती.महिनाभरानंतर म्हणजे एक जून रोजी अंबिकाचा जाळून खून केला. त्यानंतर जमावाने पोलिस आधिकार्यासमोर पाच गाड्या जाळल्या त्यात दोन पोलिस गाड्यााचा समावेश होता.
या हिंसाचारात घटनास्थळावर उपस्थित असणारे चार पोलीस जखमी झाले. पोलीस अधीक्षक अभिषेक सिंह यांनी सांगितले की, अंबिकाला झाडाला बांधून जाळण्यात आले होते. त्याची हत्या प्रेयसीच्या नातेवाइकांनीच केली असावी असा संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे.