नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत-चीन सीमारेषा वादावरुन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केल्याचा दावा भारताने फेटाळून लावला आहे. मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सध्या कोणतीही चर्चा झालेली नाही. ट्रम्प यांनी चीनसोबत सुरु असलेल्या वादावरुन मोदी सध्या चांगल्या मूडमध्ये नाहीत अशी माहिती व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही. 4 एप्रिल रोजी हायड्रोक्लोरोक्वीन गोळ्यांच्या मुद्द्यावर त्यांच्यात शेवटची चर्चा झाली होती, अशी माहिती अधिकार्याने दिली आहे. पुढे गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयानेही चीनसोबत प्रस्थापित यंत्रणा आणि अधिकार्यांच्या मार्फत संपर्कात असल्याचे स्पष्ट केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना भारत-चीन सीमा वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी आपली चर्चा झाल्याचे सांगितले. यावेळी नरेंद्र मोदीसोबत चीनसोबत सुरु असलेल्या वादामुळे चांगल्या मूडमध्ये नसल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये एक मोठा वाद सुरू आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर करतो. ते एक चांगले व्यक्ती आहेत. भारत आणि चीन या दोन्ही देशांची 1.4 अब्ज लोकसंख्या आहे. दोन्ही देशांचे लष्करही शक्तिशाली आहे. भारत या संपूर्ण प्रकारावरुन नाराज आहे. चीनदेखील नाही. जर त्यांनी माझ्याकडे मदत मागितली तर मी नक्कीच मध्यस्थी करेन असे ट्रम्प म्हणाले. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली आहे. चीनसोबत जे काही सुरू आहे त्यावरून त्यांचा मूड अजिबात ठीक नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.