उन्नाव : वृत्तसंस्था – उन्नाव गँगरेप पीडितेच्या कुटुंबियांनी गेल्या वर्षात जवळपास ३३ वेळा पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत पीडित कुटुंबाने म्हटले होते की, त्यांना आमदार कुलदीप सिंह सेंगरपासून धोका आहे. यानंतरही पोलिसांनी या प्रकरणाला हलक्यात घेतले. परिस्थिती इतकी बिकट झाली की, पीडितेने आपले घरही सोडले.
तक्रारींमध्ये म्हटलं होतं की, तिला टारगेट केलं जाऊ शकतं. पोलिसांचं म्हणणं आहे की, या तक्रारीत काही दम नाही. एका नातेवाईकाने सांगितले की, जेव्हापासून आमदाराला अटक केली होती तेव्हापासून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. पीडित कुटुंबाने धमकावणाऱ्याचे व्हिडीओदेखील बनवले होते. १३ जुलै रोजीही पोलिसांत तक्रार दाखल केली होती. उन्नावचे एसपी एमपी वर्मा देखील हे मान्य करतात की, ३३ तक्रारी पोलिसांना मिळाल्या होत्या. यातून पोलिसांचे दुर्लक्षक करणे उघडपणे दिसत आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. डीजीपी ओपी सिंह, ए़़डीजीपी आयजी रेंज एसके भगत रविवारपासूनचे हे प्रकरण पहात आहेत. एसआयटी देखील या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एकत्र आली आहे. एक-दोन वर्षांपूर्वी काही पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती ज्यांच्यावर आरोपींना सामील असल्याचे आरोप होते. यावेळी हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे की, तपासानंतर कोणत्या पोलिस कर्माचाऱ्यांवर कारवाई होते.
पीडीतेच्या काकांना पॅरोल
उन्नाव गँगरेप पीडितेच्या काकांना १८ तासांसाठी पॅरोल मिळाला आहे. हा पॅरोल त्यांना पत्नीच्या अंत्य संस्कारात सहभागी होण्यासाठी देण्यात आला आहे. उन्नावच्या गंगाघाट कोतवाली भागातील बालूघाटमध्ये आज गँगरेप पीडितेच्या काकूंचे अंत्य संस्कार होणार आहेत. इलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ पीठाने नातेवाईकांच्या याचिकेवर पत्नीचे अंत्य संस्कार करण्यासाठी पीडितेच्या काकांना 18 तासांचा पॅरोल दिला आहे. याआधीही पीडित कुटुंबाने काकांच्या सुटकेसाठी सरकारकडे मागणी केली होती.
पीडिता आणि वकिलाची हालत गंभीर
रविवारी (दि 28 जुलै) उन्नाव गँगरेप पीडिता आपल्या मावशी आणि काकूला भेटायला जात होती. तेव्हाच रायबरेलीत झालेल्या अपघातात मावशी आणि काकूचा मृ्त्यू झाला. या अपघातानंतर पीडिता आणि तिचे वकिल व्हेंटीलेटरवर आहेत. लखनऊमधील केजीएमयू ट्रामा सेंटरमधील डॉक्टरांच्यानुसार, १९ वर्षीय रेप पीडिता आजही व्हेंटीलेटरवर आहे. मंगळवारी तिची हालत स्थिर असल्याचे सांगण्यात आले होते. वकिलही व्हेंटीलेटरवर आहे. युपी पोलिसांनी अपघाताप्रकरणी सेंगर आणि इतर नऊ लोकांवर सोमवारी खुनाची केस दाखल केली आहे. उत्तर प्रदेशातील बांगरमऊमधून चार वेळा आमदार राहिलेल्या आमदार सेंगर यांना मागील वर्षी एप्रिल महिन्यात अटक केली होती.