पुणे : बहुजननामा ऑनलाईन – अवैधरित्या सावकरी करणाऱ्या दोघा सावकारांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-1 ने अटक केली आहे. तर त्यांच्याबाबत कोणाची तक्रार असल्यास कळविण्याचे आवाहन देखील केले आहे. उमेश चंद्रकांत घारे (रा. सनसिटी, सिंहगड रोड) आणि संदीप घारे (वारजे माळवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत प्रवीण बाफना यांनी तक्रार दिली आहे. बाफना हे व्यवसायिक आहेत. त्यांना पैश्यांची आवश्यकता होती. यामुळे त्यांनी खासगी सावकार उमेश घारे याच्याकडून 2 लाख रुपये घेतले होते. 10 टक्के व्याजाने हे पैसे घारे याने दिले होते.
व्याजाने पैसे देताना गहाण म्हणून आरोपींनी एक ब्लॅक चेक व एक कार देखील ठेवून घेतली होती. मात्र त्यांना व्याज व मुद्दल देण्यास उशीर होत असल्याने दोघेही फिर्यादी यांच्या घरी जात. त्यांना अश्लील शिव्या देत. तसेच त्यांना जीवे ठार मारण्याचा तसेच ओआय तोडून टाकू अश्या धमक्या देत. हे प्रकरण मिटवण्यास फिर्यादी यांचा मित्र मध्यस्थी करण्यास आला असता त्याला देखील शिवीगाळ करत त्याची बुलेट सिक्युरिटी म्हणून ओढून नेली होती. तर व्याजाचे 14 लाख आणि मुद्दल 2 लाख असे मागत त्यांना धमकवण्यात येत होते. पण पैसे नसल्याने फिर्यादी पैसे देत नसत. मात्र आरोपी त्यांना सतत धमकावत होते. या त्रासाला कंटाळून त्यांनी वारजे माळवाडी पोलिसांकडे तक्रार केली होती. पण वारजे पोलिसांनी केवळ या दोघांना समज देऊन पैसे न मागण्यास सांगत सोडून दिले. तरीही आरोपी हर फिर्यादी यांना धमकावत. यानंतर त्यांनी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एककडे तक्रार केली होती. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विठल पाटील यांनी याप्रकरणाची चौकशी केली.
त्यानंतर या पथकाने छापा टाकत त्या दोघांना पकडले. त्यांच्या घर आणि दुकानावर छापे मारले असता त्यांच्याकडे अनेक वाहनांचे कागदपत्रे, ब्लॅक चेक, स्टॅम्पवर अंगठे घेतले कागदपत्रे मिळाली आहेत. या दोघांवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. त्यांनी अवैधरित्या सावकरी करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी या दोघांविरोधात कोणाची तक्रार असल्यास गुन्हे शाखेत तक्रार करावी, असे आवाहन केले आहे. ही कारवाई उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदनाखाली वरिष्ठ निरीक्षक विठलं पाटील, सहाय्यक निरीक्षक संदीप बुवा, कर्मचारी लांडगे, केकाण, हनुमंत कांदे, प्रफुल्ल चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.