बहुजननामा ऑनलाइन टीम – दोन प्रौढ व्यक्ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहू शकतात, या संदर्भात अलाहाबाद हायकोर्टाने (Allahabad High Court)फरुखाबादचे वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहणाऱ्या अशा एका जोडप्यास सुरक्षा देण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती अंजनी कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती प्रकाश पडिया यांनी सोमवारी कामुनी देवी आणि फर्रुखाबादच्या अजय कुमार यांच्या वतीने दाखल केलेल्या रिट याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिला.
प्रौढ आहेत आणि एकमेकांवर प्रेम करतात
दोघेही प्रौढ असून एकमेकांवर प्रेम करतात, असा याचिकाकर्त्यांनी कोर्टासमोर युक्तिवाद केला. ते गेल्या सहा महिन्यांपासून जोडपे म्हणून एकत्र राहत आहेत, पण कामिनीचे आई-वडील तिला त्रास देत आहेत. कामिनीच्या आई-वडिलांनी तिला एका वयस्कर व्यक्तीशी लग्न करावे अशी इच्छा असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.
वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली
याचिकाकर्त्यांनी 17 मार्च 2020 रोजी फर्रुखाबाद वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती, परंतु अद्यापपर्यंत त्यांचा अर्ज प्रलंबित आहे.
हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही
खंडपीठाने संबंधित पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर म्हटले आहे की, “माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये अशी व्यवस्था केली आहे की, जेथे मुलगा व मुलगी प्रौढ आहेत आणि आपल्या इच्छेनुसार एकत्र राहात असतील तर कोणालाही त्यांच्या एकत्र राहण्यात हस्तक्षेप करण्याचा कोणालाही अधिकार नाही.”
शांततापूर्ण जीवनात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही
ही याचिका स्वीकारताना खंडपीठाने म्हटले आहे की, “या याचिकाकर्त्यांना एकत्र राहण्याचे स्वातंत्र्य आहे आणि कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या शांततापूर्ण जीवनात हस्तक्षेप करण्याची परवानगी दिली जाणार नाही.” भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 नुसार जीवन जगण्याचा हक्क हा मूलभूत अधिकार आहे, ज्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला जीवन जगण्याच्या आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात येणार नाही.”