पेशावर : वृत्तसंस्था – मुलीने लग्नास नकार दिल्याने पाकिस्तानातील एका टिकटॉक स्टारने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यापूर्वी देखील त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी त्याला वाचवण्यात यश आले होते.
शहजाद अहमद (वय 20) असे आत्महत्या केलेल्या टिकटॉक स्टारचे नाव आहे. शहजादचा भाऊ सज्जातने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. द एक्स्प्रेस ट्रिब्युनने दिलेल्या वृत्तानुसार, शहजाद टिकटॉकवर प्रचंड लोकप्रिय होता. त्याचे टिकटॉकवर 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. शहजादचे एका मुलीवर प्रेम होते. मात्र, तिच्या वडिलांनी त्याच्या लग्नाचा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यामुळे शहजादला मोठा धक्का बसला होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचे सज्जातने सांगितले आहे. तर शहजादच्या मित्र अमिरने सांगितले की, 2 वर्षांपूर्वी एका मुलीने चाहती असल्याचे सांगत शहजादसोबत संपर्क साधला होता.
दोघांत त्यानंतर मैत्री झाली. मुलगी अल्पवयीन असून तिचे वय 16 वर्ष आहे. शहजादने मुलीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र, मुलीने नकार दिला आणि यापुढे संपर्क न साधण्याची विनंती केली. त्यानंतर त्याने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच उपचार केल्यामुळे त्याचे प्राण बचावले होते. शहजाद मुलीला महागड्या भेट वस्तू दिल्या होत्या. त्यावेळी तिच्या पालकांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे त्यांचाही होकार असावा अशी समजूत त्याची झाली असावी, असे अमिरने सांगितले.