मुंबई : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी काल केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सर्वसामान्यांना फक्त खोटी स्वप्ने दाखवली असल्याची टीका राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पावर केलेली ही टीका भाजपाच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. भाजपाचे आशिष शेलार यांनी ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवर ट्विट केले आहे. गेली अनेक वर्षं मुंबईकरांसोबत बनवाबनवी सुरु असून हे तर ठग्ज ऑफ मुंबईकर आहेत, असे शेलार यांनी लिहिले आहे. यात शिवसेनेच्या नावाचा उल्लेख केलेले नाही.
शेलारांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निशाणा साधताना म्हटले आहे की, मुंबईकरांना चोवीस तास पाणी देऊ म्हणणार्यांनी 24 तास बार उघडे ठेवलेत. गेले 3 दिवस मुंबईकर पाण्यावाचून तडफडत होते. गेली अनेक वर्षं मुंबईकरांसोबत बनवाबनवी सुरु असून हे तर ठग्ज ऑफ मुंबईकर आहेत.
केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा हा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीशी फारकत घेतलेला आणि वास्तवाचे भान हरपून देशातील युवा, शेतकरी आणि सर्वसामान्यांना केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा आहे, अशी टीका मुख्यमंत्री केली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पानंतर चिंता व्यक्त केली. एलआयसी आणि आयडीबीयमधील भागीदारी विकण्याचा सरकारचा निर्णय, तसेच रेल्वेचे खासगीकरण हे निर्णय देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाल्याचे दर्शवतात. शिवाय काही बॉण्ड परदेशी लोकांना उपलब्ध करून देण्याचा सरकारचा निर्णय काळजी वाढवणारा आहे, असे त्यांनी म्हटले होते.
महाराष्ट्रावर अन्याय झाल्याचे भावना व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते की, या अर्थसंकल्पाने राज्यातील रेल्वे विकासाला कोणतीही गती दिलेली दिसत नाही. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे आणि मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा जुनाच उल्लेख पुन्हा करण्यात आला आहे. तसेच या अर्थसंकल्पाने देशाच्या विकास वाढीचे इंजिन असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्रावर मोठा अन्याय केला आहे. मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासाला, मेट्रोला अपेक्षित अर्थबळ दिलेले नाही. अर्थसंकल्पात मुंबईकरांची लाइफलाइन असलेल्या उपनगरीय रेल्वे सेवेचाही उल्लेख नाही. तसेच प्रस्तावित रेल्वे लाइनच्या विकासाचाही उल्लेख नाही.