बहुजननामा ऑनलाइन टीम –राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन निवडून आल्यास अमेरिका चीनच्या ताब्यात जाईल असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. मागील साडेतीन वर्षांपासून अमेरिकेने चीनविरोधात घेतलेल्या कठोर भूमिकेचे समर्थन करताना ट्रम्प यांनी केवळ चीनला उघडपणे विरोध केल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये चीन हस्ताक्षेप करु शकतो अशी शक्यता गुप्तचर विभागाने व्यक्त केल्याचा संदर्भही या मुलाखतीमध्ये ट्रम्प यांनी दिला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांना निवडून आणण्यासाठी चीन खूप प्रयत्न करत असल्याचा दावाही त्यांनी केला. जो बायडेन निवडून आले तर आपला देश चीनच्या ताब्यात जाईल. मागील साडेतीन वर्षांच्या कारभार पाहिला तर चीन विरोधात बोलणार मी एकमेव राष्ट्राध्यक्ष होतो.
गुप्तचर यंत्रणांना दिलेला अहवाल मी पाहिला असून त्यामध्ये जो बायडेन निवडून येण्यासाठी चीन प्रयत्न करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसे झाले तर आपला देश नक्कीच चीनच्या ताब्यात जाईल. आम्ही चीनबरोबर ज्या पद्धतीने वागलो आहोत तशी कठोर भूमिका आतापर्यंत कोणीच घेतलेली नाही, असेही ट्रम्प यांनी नमूद केले आहे. जो बायडेन हे चीनच्या प्रभावाखाली असणारे नेते असल्याची टीकाही त्यांनी केली. ते निवडून आल्यास संपूर्ण अमेरिकाही बिजिंगच्या ताब्यात जाईल. माझा या निवडणुकीमध्ये दारुण पराभव व्हावा अशी त्यांची (चीनची) इच्छा आहे, असेही ट्रम्प म्हणाले.