बहुजननामा ऑनलाईन टीम : प्रतापगढ (उत्तर प्रदेश) येथे राहणा-या तरुणाने एका तृतीयपंथीयाशी विवाह केला आहे. त्यांचा विवाहसोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या लग्नाला गावातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी या नवीन जोडप्याला त्यांच्या पुढील संसारिक वाटचालीकरिता नांदा सौख्यभरे अशा मंगलमय शुभेच्छा अन् आशीर्वाद दिले. दरम्यान या विवाहाची परिसरात चर्चा सुरु आहे.
शिवकुमार वर्मा असे या तरुणाचे नाव आहे. शिवकुमारचे प्रतापगढ येथेच राहणा-या अंजली सिंह या तृतीयपंथीयावर प्रेम होते. काही वर्षांनी दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. गावक-यांनी देखील त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. दोघांच्याही नातेवाईकांनी त्यांच्या विवाहाला मान्यता दिली.अयोध्येतील नंदीग्रामातील भरतकुंडातील एका प्राचीन मंदिरात या दोघांची लग्नगाठ बांधण्यात आली. अग्निभोवती सात प्रदक्षिणा घालून शिवकुमार वर्माने तृतीयपंथी अंजली यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला.
तृतीयपंथी अंजली सिंह यांची बहीण आणि त्यांचे पती या दोघांनी त्यांचे लग्न लावून दिले आहे. विवाहानंतर त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. एक तरुण आणि तृतीयपंथीय यांच्यातील प्रेमाचे विवाहात रुपांतर होणे, हा प्रतापगढमधील गावकऱ्यांसाठी एक सुखद धक्काच होता. त्यामुळे गावातील लोकांनी शिवकुमार वर्मा या तरुणाच्या एका तृतीयपंथीयाशी लग्न करण्याच्या आगळ्यावेगळ्या निर्णयाचे कौतुक केले आहे.