मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भारतीय चलनातील नोटा ओळखण्यासाठी आता दृष्टीहीन तसेच अंध व्यक्तींना मोबाईल ऍपचा वापर करता येणार आहे. या ऍपचे मोबाईल सॉफ्टवेअर विकसीत करण्याचे काम सद्या प्रगतीपथावर असून सहा ते सात महिन्यात ते उपलब्ध होईल, अशी माहिती रिझर्व्ह बॅंकेने आज उच्च न्यायालयात दिली.
सध्या चलनात असणाऱ्या नव्या नोटा तसेच नाणे ओळखणे हे दृष्टीहीन लोकांना कठीण जात असल्याने नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड या संस्थेच्या वतीने ऍड. उदय वारूंजीकर यांनी नवीन नोटा व नाणे ओळखता यावे यासाठी नोटांवर संकेत अथवा चिन्हे वापरण्याचे आदेश द्या, अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
यावेळी रिझर्व्ह बॅंकेच्या वतीने जेष्ठ वकील श्याम मेहता यांनी भूमीका स्पष्ट करताना रिर्झव्ह बॅंकेने या संदर्भात चार तज्ज्ञांची कमिटी स्थापन करण्यात आली असून त्यांनी दिलेल्या अहवालानंतर मोबाईल ऍप तयार करण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. काही महिन्यात हे सॉप्टवेअर उपलब्ध होणार आहे. तसेच १०० व त्या पेक्षा अधिक मुल्य असणाऱ्या नोटा ओळखण्यासाठी विशिष्ट चिन्हाचा वापरण्यात आल्याची माहिती दिली. या ऍपमुळे अंध व्यक्तींना दिलासा मिळणार आहे