औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागातील संचालकपदाचा खो-खो सारखा खेळ गुरुवारी पुन्हा पाहायला मिळाला. विद्यापीठाकडून अपमानाजनक वागणूक मिळात असल्यामुळे डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सकाळीच मेलद्वारे पदभार सोडला. डॉ. दिगंबर नेटके पदभार घेण्याची शक्यता आहे.
विद्यापीठ परीक्षा संचालकपदी सहा महिन्यांपूर्वी डॉ. साधना पांडे यांच्याकडून डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला होता. या अगोदरच या पदावर डॉ. दिगंबर नेटके हे होते. पण नापास विध्यार्थ्यांना पदवी प्रदान केल्या कारणावरून त्यांना त्या पदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर हा पदभार डॉ. पांडे यांच्याकडे देण्यात आला.आणि शेवटी डॉ.जयश्री सूर्यवंशी यांच्याकडे हा पदभार देण्यात आल्यानंतर परीक्षा विभागातील कारभार समजून घेण्यातच २ ते ३ महिने गेले.परीक्षेची तयारी सुरू असतानाच त्यांच्याकडून तडकाफडकी पदभार काढण्यात आला. याचे कोणतेही कारण देण्यात आलेले नाही.असे डॉ.जयश्री सूर्यवंशी याने सांगितले.
कुलगुरूंनी माझ्यासोबत कसलीच चर्चा केली नाही. त्यामुळे त्यांनी कुलगुरूंशी चर्चा केल्यानंतरच पदभार सोडणार अशी भूमिका घेतली होती. पण कुलगुरू दौऱ्यावरून परतण्यास दोन दिवस लागणार असल्यामुळे मी मेलद्वारेच पदभार सोडत असल्याचे कळवून मूळ नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झाले, असे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले. कुलगुरूंनी दिलेली वागणूक अवमानकारक आहे. महिला दिनाची ही दिलेली मला भेट असल्याची कडक टीकाही त्यांनी पदभार सोडताना केली. पदभार घेण्यास कोणीही तयार नसताना माझ्या माथी मारले.आणि पाठीशी उभे राहण्याऐवजी सोयीनुसार पदभार काढून घेतला.
तिसऱ्यांदा पदभार घेण्यास डॉ. नेटके तयार झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. नुकत्याच झालेल्या परीक्षा संचालकपदाच्या मुलाखतीमध्ये डॉ. नेटके यांना कुलगुरूंनी अपात्र ठरविलेले आहे. आता चवथा व्यक्ती या पदावर कोण असेल या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.