बहुजननामा ऑनलाइन टीम – टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन(cricketer Azharuddin) यांची गाडी कोट्यात पलटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. लालसोट कोटा मेगा महामार्गावरील सुरवाल पोलिस ठाण्याजवळ ही घटना घडली. या अपघातात ते थोडक्यात बचावले. दरम्यान, भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आपल्या कुटुंबासमवेत रणथंभोरला येत होता.
माहितीनुसार माजी क्रिकेटपटू अझरुद्दीनच्या चालत्या गाडीचा टायर निघाल्याने गाडी अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या ढाब्यात घुसली. या अपघातात अझरुद्दीन व त्याच्या कुटूंबाला कोणतीही इजा झाली नाही, तर ढाब्यावर काम करणारा चाळीस वर्षाचा माणूस जखमी झाला आहे, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुसर्या गाडीने हॉटेलला
या भीषण अपघातानंतर तिथे गर्दी जमली. कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला दुसर्या वाहनाच्या मदतीने हॉटेलमध्ये नेण्यात आले. त्याचबरोबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ढाब्यावर काम करणाऱ्या जखमी झालेल्या एहसानला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन ज्या गाडीने कुटुंबासमवेत रणथंभोरला येत होता त्यावर दिल्लीचा नंबर आहे. त्याचवेळी या अपघाताची माहिती मिळताच सुरवाल पोलिस ठाणे तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरण हाताळले. अझरुद्दीन हा केवळ टीम इंडियाचा दिग्गज कर्णधार आणि फलंदाजच नाही तर राजकारणातही सहभाग नोंदवितात. ते कॉंग्रेसकडून लोकसभेचे खासदार राहिले आहेत.