पुणे : बहुजननामा ऑनलाईन – भाजप- सेनेचे वेळोवेळच्या आश्वासनंतर महामंडळाच्या नियुक्त्या आणि भाजपकडून मिळत असलेल्या वागणुकीमुळे रिपब्लिकन पक्षात (आठवले गट) पडलेल्या दोन गटांतील संघर्ष ऐरणीवर आलाआहे. माजी शहराध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष महेंद्र कांबळे यांची हकालपट्टी करण्याचा ठराव शहर रिपब्लिकन पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.त्यामुळे पक्षात फूट पडणार आहे.
गेल्या आठवड्यात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले पुण्यात आले असताना त्यांना भाजपकडून हीन वागणूक दिली जात असल्याचे कारण पुढे करीत मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांच्यासह काही जणांनी पक्षाचे राजीनामे दिले होते. त्यामुळे रिपब्लिकन पक्षात फूट पडली होती.
त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा पुण्यात घडला आहे. पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे यांच्या उपस्थितीत गुरुवारी बैठक झाली. माजी अध्यक्ष महेंद्र कांबळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा ठराव या वेळी मंजूर करण्यात आल्याचे सरचिटणीस महिपाल वाघमारे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.