पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – अज्ञात व्यक्तीने भटक्या कुत्र्या(Nomadic dog)वर धारधार शस्त्राने वार करून त्याचे डोळे फोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सांगवी येथे गुरुवारी (दि. 27) सकाळी ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात इसमावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी प्राणी मित्र अक्षय साहेबराव म्हसे (25, रा.पवारनगर, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी म्हसे हे प्राणीमित्र असून ते दररोज भटक्या कुत्र्यांना अन्न देतात. दरम्यान गुरुवारी सकाळी त्यांना पवारनगरमध्ये भटक्या कुत्र्यावर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने वार केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, त्यांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ कुत्र्याला रुग्णालयात दाखल केले. कुत्र्यावर धारदार शास्त्राने वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. तसेच डोक्याला गंभीर मार लागल्याने दोन्ही डोळे निकामी झाले आहेत. कुत्र्याची प्रकृती चिंताजनक असून त्याला कायमचे अंधत्व येण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. सांगवी पोलिस तपास करीत आहेत.