नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सन २०१५ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने लॉ कॉलेज येथे ‘संविधान प्रास्ताविक पार्क’ उभारण्याचा संकल्प केला होता. वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी यांना या समितीचे अध्यक्ष करण्यात आले. समितीने अनेक बैठकाही घेतल्या. विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा १४ एप्रिल २०१६ पयंर्त उभारण्याचा संकल्पही करण्यात आला. मात्र, हे सर्व संकल्प हवेत विरले असून संविधान प्रास्ताविक पार्कचे काम बंद पडले आहे. विद्यापीठ प्रशासन आणि समितीच्या दुर्लक्षामुळे हा आशादायी प्रकल्प बंद पडल्याचा आरोप होत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विद्यापीठातर्फे विविध उपक्रम आखले होते. याचाच एक भाग म्हणून लॉ कॉलेज येथे संविधान प्रास्ताविक पार्क उभारण्याचा संकल्प करण्यात आला होता. यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने विविध बैठका घेत एप्रिल २०१६ पर्यंत बाबासाहेबांचा १० ते १२ फुटांचा ब्राँझ धातूचा पुतळा येथे उभारण्याचे निश्चित केले. यासाठी २५ लाख रुपयांपर्यंतचा खर्च अपेक्षित असून समितीचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, आमदार प्रकाश गजभिये आणि आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे प्रत्येकी पाच लाख रुपयांचा निधी गोळा करावा, असे ठरविण्यात आले होते. हा संपूर्ण प्रकल्प दोन ते तीन कोटी रुपयांचा असून प्रथम टप्प्यात पूर्णाकृती पुतळ्याचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सर्व रक्कम ही लोकप्रतिनिधी व विद्यापीठ निधीतून उभी करण्यात येणार होती. विद्यापीठानेही आपल्या दरवर्षीच्या अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद केली. नवीन पुतळ्यासाठी पिंपळी चिंचवड येथील पुतळ्याची पाहणी करण्यात येणार असून तशा धाटणीचा पुतळा आणि परिसर उभारण्यावर निर्धारही करण्यात आला होता. मात्र, या घटनेला आज तीन वर्षांचा कालावधी लोटला असून ना पार्क ना पूर्णाकृती पुतळा असे चित्र आहे. त्यामुळे समिती आणि विद्यापीठ प्रशासनाच्या एकंदर कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पूर्णाकृती पुतळ्याचे काम सुरू आहे. पुतळा तयार करण्यासाठी देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत त्याचे काम पूर्ण होणार असून दोन महिन्यांवर असलेल्या बाबासाहेबांच्या जयंतीपर्यंत या पुतळ्याची उभारणी करण्याचा विद्यापीठ पूर्णपणे प्रयत्न करणार आहे.