बहुजननामा ऑनलाइन टीम – ऑटो रिक्षा उलटून झालेल्या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षातील अन्य तिघे जखमी झाले आहेत. येथील येऊर घाटात रविवारी (दि. 17) मध्यरात्री पावणे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र अपघात नेमका कसा घडला हे अद्यापही समजू शकलेले नाही
दीपक भिडे (42) असे मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. तर मिथुन मुकुंद मंडळ ( 26) त्याची पत्नी रेश्मा (23) आणि सुभाषण फुलचंद यादव (24) असे तिघे जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात जखमी मिथुन यांच्या डोक्याला तर त्यांची पत्नी रेश्मा हिच्या डोके आणि उजव्या हाताला दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच वर्तक नगर पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली. मदतकार्य सुरू करून जखमी व्यक्तींना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. सदर रिक्षा रामबंश यादव यांच्या मालकीची असून या अपघातात रिक्षाचे नुकसान झाले आहे. तपास वर्तकनगर पोलीस करत आहेत.