अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – मागील सरकारच्या काळात मला काही अडचणी आल्या. मी मोठा त्रास सहन केला. यावेळी धनंजय मुंडे यांनी मला त्या संकटातून सोडवण्यासाठी मोलाची मदत केल्याचा गौप्यस्फोट पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथे संत वामनभाऊ, संत भगवानबाबा प्रतिष्ठानच्या वतीने संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते डॉ. तात्याराव लहाने यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी डॉ़ लहाने बोलत होते. त्यांचा रोख माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर असल्याचे बोलले जाते.
यावेळी डॉ़ लहाने म्हणाले, धनंजय मुंडे यांनी मला त्या संकटातून सोडवण्यासाठी मोलाची मदत केली. मी धनंजय मुंडे यांचे जाहीर आभार मानीन. माझ्या आयुष्यातील पुण्य धनंजय मुंडे यांना मिळो.
डॉ़ तात्याराव लहाने यांच्या या खळबळजनक वक्तव्याने फडणवीस सरकाराने केलेल्या अन्यायाच्या कथा आता बाहेर येऊ लागल्या आहेत. लोक बोलायला लागले असल्याची चर्चा सुरु झाली आहे.