पुणे : बहुजननामा ऑनलाईन – नगर रचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्या उत्पन्नापेक्षा अधिक अपसंपदा धारण केल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्या भाच्याकडून तब्बल ३५ बनावट करारनामे हस्तगत केले आहेत. राहुल शिवाजी खोमणे (वय ३१, रा. शिरवली, ता. बारामती) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याच्या पोलीस कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. राहुल खोमणे हा हनुमंत नाझीरकर याच्या सख्या बहिणीचा मुलगा आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अलंकार पोलीस ठाण्यात हनुमंत नाझीरकर यांच्यासह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राहुल खोमणे याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने २४ मार्च रोजी अटक केली होती. त्याची पोलीस कोठडी १ एप्रिल रोजी संपत असल्याने त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले होते.
राहुल खोमणे याने तयार केलेल्या बनावट करारनाम्यापैकी ३५ करारनामे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हस्तगत केले आहेत. तसेच या व्यतिरिक्त ३४६ कृषी पावत्या जप्त करावयाच्या आहेत. राहुल खोमणे याच्या वैयक्तिक बँक खात्यावर ८७ लाख रुपयांचे व्यवहार झाले आहेत. गितांजली ब्रिडर्स कंपनीत २३ लाख रुपयांची गुंतवणुक त्याने केली आहे. ही गुंतवणूक त्याच्या उत्पन्नापेक्षा प्रचंड जास्त प्रमाणात आहे. हे पैसे त्याने कोणाकडून घेतले, याचा तपास करायचा आहे. राहुल खोमणे याच्या नावे आणखी कोणकोणत्या बँकेचे कर्ज घेऊन त्यानंतर ते नाझीरकर कुटुंबिय भागीदार असलेल्या कंपन्यांकडे वळविण्यात आले आहे, याबाबत अधिक तपास करायचा आहे.
पोलीस कोठडीत असलेला मुख्य आरोपी हनुमंत नाझीरकर आणि राहुल खोमणे यांना समोरासमोर बसून चौकशी करुन तपास करायचा आहे. त्यामुळे खोमणे याच्या पोलीस कोठडीत वाढ करावी, अशी मागणी पोलीस निरीक्षक गिरीश सोनवणे यांनी सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांच्यामार्फत केली. न्यायालयाने ती मान्य करुन खोमणे याला ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. अपसंपदा प्रकरणातील मुख्य आरोपी हनुमंत नाझीरकर याला ही न्यायालयाने ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या तपासात हनुमंत नाझीरकर याने आपल्या पदाचा गैरवापर करुन लाचखोरी करुन तब्बल ८२ कोटी रुपयांची माया जमविल्याचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या तपासात आतापर्यंत निष्पन्न झाले आहे.