विद्यार्थ्‍यांमध्‍ये बालवयातच वृक्षप्रेम व पर्यावरण विषयक जाणीव रुजवावी : जिल्‍हा‍धिकारी जितेंद्र पापळकर

July 6, 2019

अकोला (प्रतिनिधी) : शासनाच्‍या ३३ कोटी वृक्षलागवड या संकल्‍पाच्‍या पूर्ततेसाठी प्रशासकीय यंत्रणेसोबतच अकोला जिल्‍हयातील सर्व विद्यार्थी आपले योगदान देणार असून सुमारे २.५ लाख विद्यार्थी – एक वृक्ष या मोहिमे अंतर्गत वृक्ष लागवड करुन संगोपन करणार आहेत.

विद्यार्थ्‍यांचे बालवयातच वृक्षाची भावनिक नाते दृढ करुन त्‍यांच्‍यामध्‍ये वृक्षप्रेम व पर्यावरण विषयक जाणीव रुजविण्‍याची शिक्षकांची जबाबदारी आहे. ही जबाबदारी आम्‍ही आज पार पाडली नाही तर येणा-या पिढया आम्‍हाला माफ करणार नाहीत. एक इश्‍वरीय कार्य समजून ही मोहिम यशस्‍वी करण्‍यासाठी सर्वांनी योगदान द्यावे. असे भावनिक आवाहन जिल्‍हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. “एक विद्यार्थी – एक झाड” हा उपक्रम सर्व मुख्‍याध्‍यापकांनी मनोभावे राबवून अकोला पॅटर्न म्‍हणून संपूर्ण राज्‍याला मार्गदर्शक ठरविण्‍यसाठी प्रयत्‍न करावेत. असे उदगार आयुष प्रसाद, मुख्‍य कार्यकारी अधिकारी जि.प. अकोला यांनी काढलेत.

“एक विद्यार्थी – एक वृक्ष” या योजनेविषयी पूर्व नियोजन सभा नुकतीच जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या नियोजन भवन येथे आयोजीत करण्‍यात आली होती, सदर सभेत उभय अधिकारी बोलत होते. यावेळी मंचावर शिक्षणाधिकारी मुकुंद, षण्‍मुगा नाथन, संस्‍थापक भारत वृक्ष क्रांती, शत्रुघ्न बिडकर, बळीराम झामरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जिचकार, उपक्रमाचे नोडल अधिकारी प्रकाश अंधारे यांची उपस्थिती होते.

सुरुवातीला सभेची पार्श्‍वभूमी प्रकाश मुकुंद यांनी विषद केली. जिचकार यांनी स्‍कूल बसेस व रहदारीचे नियम याबाबत माहिती दिली. “एक विद्यार्थी – एक वृक्ष” या उपक्रमाचे जनक षण्‍मुगा नाथन यांनी ही विचार व्यक्त केलेत. सभेला जिल्‍हयातील सर्व माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शाळांचे मुख्‍याध्‍यापक, गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्‍तार अधिकारी, अरविंद जाधव, साजीया नौशिन, केंद्र प्रमुख उपस्थित होते. सर्व गट शिक्षणाधिकारी यांना या मोहिमेचे तालुका नोडल अधिकारी म्‍हणून नियुक्‍त करण्‍यात आले. याप्रसंगी षण्‍मुगा नाथन यांचा मा. जिल्‍हाधिकारी यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.