चंदीगढ : वृत्तसंस्था- हरियाणाच्या गुरुग्राममध्ये एका महिलेसोबत पोलीस ठाण्यात चौकशीदरम्यान अमानुष मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस ठाण्यात महिलेला फक्त मारहाण नाही झाली तर, तिचे कपडे काढून तिच्या प्रायव्हेट पार्टवरही आघात करण्यात आला. डीएलएफ फेज 1- एच ब्लॉक स्थित एका घरात चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली ईशान्येकडील या महिलेला ठाण्यात 9 तास अमानुषपणे मारहाण केली. तिला इतकी बेदम मारहाण झाली की, तिचं चालणंही मुश्किल झालं. ईशान्येकडील लोकांनी या गोष्टीचा निषेध केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे.
रात्री उशीरा पोलीस आयुक्त मोहम्मद अकिल यांनी ठाण्याचे एचएसओ महिला हवालदाराला हजर केलं. या प्रकरणी एक महिला एएसआय आणि एका हवालदाराला निलंबित केले आहे. पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे की, पूर्ण प्रकरणाचा विभागीय तपास सुरू करण्यात आला आहे. मूळ असमची रहिवासी 30 वर्षीय महिला डीएलएफ फेज-1 एच ब्लॉक मधील रुम नंबर 9/7 मध्ये कामवाली म्हणून काम करत होती.
31 जुलै रोजी या घरात चोरी झाली. घरामालकाने सदर महिला नोकरासह इतर दोघांवर चोरीचा संशय व्यक्त केला. मंगळवारी पोलिसांनी तिघांना पोलीस ठाण्यात बोलावलं. पोलिसांनी महिलेचे कपडे उतरवत तिला मारहाण केल्याचा पीडित महिलेचा आरोप आहे. इतकेच नाही तर नाजुक अंगावरही आघात झाल्याचे तिचे म्हणणे आहे. तिची कातडी देखील सोलली आहेत.