नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेकजण उद्योग करण्याकडे वळले आहेत. परंतु, अशा लोकांपुढे कोणता उद्योग सुरु करण्यापासून ते भांडवल, किती नफा मिळू शकेल यांसारखे असंख्य प्रश्न समोर आहेत. मात्र असा एक व्यवसाय आहे जो कमी खर्चात जास्त नफा मिळवून देऊ शकतो. तो व्यवसाय म्हणजे डेअरी उत्पादन.
व्यवसाय म्हंटल तर पहिला प्रश्न पडतो तो नुकसानीचा, मात्र डेअरी उत्पादनात असे सहसा होत नाही कारण, दुग्धजन्य पदार्थ असे आहेत की ज्यांचा दररोज वापर केला जातो. यामुळे जास्त नुकसान नाही तर या व्यवसायात जास्त नफा आहे. जर आपण डेअरी उत्पादनाच्या व्यवसायात ५ लाख रुपयांची गुंतवणुक केली तर दरमहा ७० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवू शकते. विशेष म्हणजे, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारही तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहे. त्यामुळे जर तुम्हीही डेअरी उत्पादनाचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असला तर नियोजन करून हा व्यवसाय करू शकता …
मुद्रा कर्ज योजनेंतर्गत मिळेल कर्ज
व्यवसाय सुरु करायचे म्हंटले की आर्थिक भांडवल गरजेचे असते. मात्र घाबरून जाण्याची काही गरज नाही. कारण, मोदी सरकारच्या पंतप्रधान मुद्रा लोन योजनेमुळे तुम्ही सहज व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकता. डेअरी उत्पादनाच्या व्यवसायासाठी सरकार आपल्याला पैशांसोबत या प्रकल्पाची संपूर्ण माहिती देते जेणेकरुन तुम्ही आरामात व्यवसाय सुरू करू शकता. डेअरी उत्पादनांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारच्या मुद्रा कर्जामधून एकूण खर्चाच्या ७० टक्के रक्कम मिळेल. प्रकल्पाच्या प्रोफाइलनुसार, या व्यवसायाचा प्रकल्प जवळपास १६ लाख ५० हजार रुपयांपर्यंत तयार केला जाऊ शकतो. मात्र, यामध्ये व्यक्तीला फक्त ५ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
कसा असेल प्रकल्प……..
पंतप्रधान मुद्रा योजनेच्या प्रकल्पानुसार, या व्यवसायात वर्षात ७५ हजार लिटर फ्लेवर्ड मिल्कची विक्री होऊ शकते. याशिवाय, ३६ हजार लिटर दही, ९० हजार लिटर लोणी आणि ४५०० किलो तूपही विकले जाऊ शकते. याचा जर हिशोब केला तर सुमारे ८२ लाख ५० हजार रुपयांचा टर्नओव्हर होईल. ज्यामध्ये सुमारे ७४ लाख रुपये खर्च येईल. यामध्ये १४ टक्के व्याज कपात करूनही तब्बल ८ लाखांची बचत होऊ शकते.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी १००० चौरस फूट जागेची आवश्यकता आहे. ज्यामध्ये ५०० चौरस फूट जागा काम करण्यासाठी, रेफ्रिजरेशन १५० चौरस फूट, वॉशिंग १५० चौरस फूट, ऑफिस, शौचालय आणि इतर सुविधांसाठी १०० चौरस फूट जागा आवश्यक आहे.