मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – एसटीमध्ये महिलांनी वाहकाची जबाबदारी सांभाळली आहे. मात्र आता एसटीचं स्टिअरिंगही महिलांच्या हाती दिलं जाणार आहे. एसटीच्या चालक-वाहक भरतीत १५० महिलांची निवड करण्यात आली असून आता या महिलांच्या हाती एसटीचं स्टिअरिंग प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर येणार आहे.
एसटी महामंडळाकडून सध्या भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यात महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या, जातीत जास्त महिलांनी यात प्रतिसाद द्यावा यासाठी काही नियम व अटीही शिथिल करण्यात आल्या होत्या. पुरुष व महिलाना अवजड वाहन परवाना व तीन वर्षे वाहन चालविण्याची अट यापुर्वी ठेवण्यात आलेली होती. मात्र आता महिलांसाठी अवजडऐवजी हलकी वाहने चालविण्याचा एक वर्षांचा परवाना अशी अट ठेवण्यात आली. त्यानुसार महिलांनी अर्जही केले. त्यात सर्व कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर चालक-वाहक पदासाठी १५० महिला पात्र ठरल्या.
त्यांना अवजड वाहन चालविण्याचा अनुभव नसल्याने त्यांना नियमानुसार त्यांना एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर महिला सेवेत दाखल होणार आहेत. पहिल्यांदा त्यांना छोट्या अंतरावरील एसटी चालविण्याचा अनुभव देण्यात येणार आहे. त्यानंतर लांब पल्ल्याच्या मार्गावर नियुक्ती दिली जाईल. तर आदिवासी युवतींसाठी वाहन चालक प्रशिक्षण योजना राबविण्यात येत असून त्यातून आतापर्यंत २१ युवतींना एसटी महामंडळाकडून एसटी चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.