इंदोर : वृत्तसंस्था – आपण अनेक प्रेरणा देणाऱ्या स्टोरीज ऐकत असतो. अशीच एक स्टोरी आज आपण जाणून घेणार आहोत. ज्या तरुणाचे वडिल कोर्टात जजचे ड्रायव्हर आणि आजोबा चौकीदार होते असा मुलगा सिव्हील जज भरती पास होत त्याच कोर्टाचा जज बनला आहे. चेतन बजाड असं त्या तरूणाचं नाव असून तो इंदोरचा रहिवासी आहे.
26 वर्षीय चेतन दुसऱ्याच प्रयत्नात ही परीक्षा पास झाला. जबलपूरमधील मध्य प्रदेश हायकोर्टाकडून आयोजित परीक्षेचा निकाल बुधवारी घोषित करण्यात आला. ओबीसी कॅटेगरीतील चेतनचा 13 वा क्रमांक आला आहे. सिव्हील क्लास 2 भरती परीक्षेत त्याने लेखी आणि मुलाखतीत 450 पैकी 257.5 मार्क मिळवले आहेत. त्याने इंदोरमधील प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमधून LLBची डिग्री घेतली आहे.
चेतन म्हणतो की, “माझे वडिल गोवर्धनलाल बजाड इंदोर जिल्ह्यातील कोर्टात ड्रायव्हर आहेत. माझ्या आजोबांनी त्याच कोर्टात चौकीदार म्हणून काम केलं आहे. माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की, तीन मुलांपैकी एकाने तरी जज बनावं. मी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. माझे वडिल माझे रोल मॉडेल आहेत. त्यांनीच मला यासाठी प्रेरीत केलं आहे. माझे दोन भाऊ आहेत जे कायद्याची प्रॅक्टीस करत आहेत. त्यांनीही मला खूप मदत केली आहे. माझे वडिल पुढील वर्षी रिटायर होणार आहेत. त्यापूर्वीच मी परीक्षा पास झालो. त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला आहे.” चेतनचे दोन मोठे भाऊ आहेत. त्यांनीही ही परीक्षा दिली होती. परंतु त्यांना अपयश आलं. यानंतर कुटुंबियांना चेतनकडून खूप अपेक्षा होती.
जज बनण्याचा विचार कसा आला ?
चेतन सांगतो की, “वडिल कोर्टात काम करत होते. घरात कोर्ट कचेरीबद्दल नेहमीच ऐकायला मिळायचं. वडिलांना दिवसरात्र कष्ट करताना पाहून वाटायचं आपणंही काहीतरी करावं. लहानपणापासून मला जज व्हायचं होतं. मी LLBची डिग्री घेण्यासाठी तयारी सुरु केली. यावेळी मी सोशल मीडियापासून दूर होतो. परंतु देशात काय चाललंय आणि कायद्यांबद्दलच्या घडामोडींबद्दल मी अपडेट होतो. मी माझ्या ध्येयावर पूर्ण फोकस होतो.”