बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या अनुषंगाने शहर आणि जिल्ह्यात पाहिल्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेस शुक्रवार पासून सुरुवात(vaccination campaign) होईल. त्यासाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांचे कोव्हिड-१९ सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी जिल्हा कृतीदल समिती आढावा बैठकीत दिले.
या बैठकीस डॉ. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, कोव्हिड-१९ विषयाचे राज्य सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. म्हैसेकर म्हणाले, राज्यातील चार जिल्ह्यात कोरोना लस देण्याची चाचणी (ड्राय रन) घेतली गेली. येत्या शुक्रवार पासून सोलापूर जिल्ह्यात ही चाचणी घेतली जाणार आहे. यासाठीची आवश्यक ती पूर्वतयारी केली जावी. लसीकरणाच्या अंमलबजावणीसाठी कर्मचारी, डॉक्टर, सपोर्ट स्टाफ यांना प्रशिक्षण देण्यात यावे. डॉ. साळुंखे यांनी जिल्ह्यातील मोठी रुग्णालये निश्चित करावी. त्या रुग्णालयांना राज्य सरकारकडून लस पुरवण्यात येईल.
संबंधित रुग्णालय प्रशासनावर लसीकरणा संदर्भातील सर्व जबाबदारी सोपवण्याचा विचारविनिमय सुरु आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सामान्य नागरिकांना लस देण्यात येणार नाही. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि आघाडीवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असल्याचे, डॉ. म्हैसेकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी कोरोनाच्या चाचण्या, उपचार आणि त्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सुविधांची माहिती दिली. लसीकरणाबद्दल सुरु असलेल्या तयारीची माहिती सुद्धा त्यांनी सांगितली