पाकिस्तान : वृत्तसंस्था – सध्या जगभरातील तरुणांना पबजी गेमचे वेड लागले आहे. या गेमच्या विळख्यात तरुणाई गुरफटत जात आहे. या गेममुळे अनेक गंभीर घटना घडल्या आहेत. या गेम्सची सवय एवढी धोकादायक ठरत आहे की, अनेक घटनांमध्ये लोकांचा जीव घेण्यास मागे-पुढे पाहिले जात नाही. अशीच एक धक्कादायक घटना पाकिस्तानमध्ये घडली आहे. पाकिस्तानमधील लाहोरमध्ये एका व्यक्तीला पबजीचे एवढे व्यसन जडले होते की, त्याने पबजीमध्ये ज्या प्रमाणे गोळ्या घातल्या जातात तशा गोळ्या आपल्या कुटुंबातील व्यक्तींवर झाडल्या. या व्यक्तीने पबजीचा सीन रीक्रिएट करत केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.
एका न्युज रिपोर्टनुसार, हा प्रकार सोमवारी लाहोरच्या नावा कोटजवळ घडला आहे. एका व्यक्तीने या गेममधील एक दृश्य रीक्रिएट केलं. ज्याचे सीसीटीव्ही फुटेज वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती पबजीचा हेल्मेट आणि जॅकेट घालून गोळीबार करीत असल्याचे दिसत आहे. या घटनेबाबत पोलिसांनी सांगितलं की, घरगुती प्रकरणात त्या व्यक्तीचा घरातील सदस्यंसोबत वाद झाला होता. त्यानंतर त्याने गोळीबार केला.
गोळ्या झाडल्याचा आवाज परिसरातील नागरिकांना ऐकायला मिळाल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यांनी आरोपीला पकडून पोलिसांकडे सोपवलं. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज युट्यूबवर शेअर करण्यात आला असून यामध्ये एक व्यक्ती गोळ्या झाडत असल्याचे दिसत आहे. या घटनेमध्ये आरोपीची वहिनी आणि मित्राचा मृत्यू झाला आहे. तर आई, बहिण आणि भाऊ गंभीर जखमी झाले आहेत.