बहुजननामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून विधिमंडळाचे कामकाज बंद होते. अखेर सहा महिन्यानंतर विधिमंडळाचे कामकाज सुरु झाले आहे. विधान भवनात पावसाळी अधिवेशनात कुणीही कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण येऊ नये याची खबरदारी घेण्यात आली आहे. मात्र संसदीय कर्य विभागाचा एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह असताना विधिमंडळाच्या आवारात फिरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सोमवारपासून दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन भरवण्यात आले आहे. विधान भवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. संसदीय कार्य विभागाचा एक अधिकारी हा कोरोना पॉझिटिव्ह असताना विधिमंडळाच्या आवारात फिरला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या अधिकाऱ्याची चाचणी करण्यात आली होती. पण त्याचा कोरोना चाचणी रिपोर्ट आला नव्हता. असं असताना या अधिकाऱ्यानं स्वत:च्या हाताने पासवर निगेटिव्ह असल्याचा पेनाने मार्क केला आणि विधिमंडळ परिसरात आला.
मात्र, या अधिकाऱ्याचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समोर आलं. विशेष म्हणजे हा अधिकारी गेल्या आठवड्यात आजारी असल्याचं त्याच्या कार्यालयीन सहकार्याने निदर्शनास आणून दिले आहे. संबंधित अधिकाऱ्याला होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं. त्याने केलेला हा प्रकार गंभीर असून याची दखल घेण्यात आली आहे. अधिकारी आजारपणातून बाहेर आल्यानंतर त्याच्यावर प्रशासकीय नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.