पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – सासू-सुनेच्या भांडणात सूनेने जुन्या ब्लाउजच्या सहाय्याने सासूचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह गोनीत बांधून 4 दिवस टेरेसवर ठेवला. त्यातून दुर्गंधी सुटल्यावर तीने पतीच्या मदतीने मृतदेह झुडपात टाकून दिला. याप्रकरणी सुनेसह तिच्या पतीला अटक केली आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे रविवारी (दि. 23) ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
बेबी गौतम शिंदे (वय 50 ), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पूजा मिलींद शिंदे (वय 22 ), मिलींद गौतम शिंदे (वय 29 ) असे गुन्हा दाखल झालेल्या सून व मुलाचे नाव आहे. अमित गौतम शिंदे (वय 22, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
तळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शिंदे हे त्यांची आई बेबी, भाऊ मिलिंद, वहिनी पूजा तसेच पुतण्या आयुष यांच्यासोबत राहतात. बेबी आणि त्यांची सून पूजा यांच्यात नेहमीच भांडणे होत होती. शुक्रवारी बेबी अन् पूजा यांच्यात पुन्हा वाद झाला होता. त्यावेळी पूजाने जुन्या ब्लाउजने बेबी यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह एका गोणीत भरून इमारतीच्या टेरेसवर ठेवून दिला. सायंकाळी अमित कामावरून घरी आल्यानंतर त्यांनी आईबद्दल विचारणा केली. त्यावेळी त्यांच्याशी भांडण झाल्याने त्या पुन्हा घर सोडून गेल्या असल्याचे पूजा यांनी सांगितले. दरम्यान त्यांच्या शेजारच्यांनी टेरेसवरून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली. त्यामुळे 3 दिवसांनी पूजा हिने तिचा पती मिलिंद याच्यासह मिळून गोणीत बांधलेला मृतदेह जिन्यातून फरफटत खाली आणला व मोकळ्या जागेतील झुडपात टाकला. संपूर्ण जीना घाण झाल्यामुळे दोघांनी जीना धूण्यास सुरवात केली. त्याच दरम्यान अमित तिथे आला. तुम्ही बिल्डिंगच्या पायऱ्या का धूत आहे, असे अमित यांनी विचारले. त्यावेळी पूजाने घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे अमित याने तातडीने पोलिसांत धाव घेतली व दोघांविरुध्द तक्रार दाखल केली आहे.