पुणे : बहुजननामा ऑनलाईन – ऐरवी अनेक भाई मोठ्या दिमाखात वाजतगाजत आपले वाढदिवस साजरे करतात. भाईचे पंटर लोक परिसरात आपली दहशत रहावी किंबहुना मार्केटमध्ये आपलं वजन, दहशत दाखवण्यासाठी भाईच्या बड्डेला राडा घालतात. भाईच्या बड्डेला उघड उघड तलवारी आणल्या जातात, भाई देखील तलवारीने केक कापतो. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करायला देखील काही महाभाग कमी करत नाहीत. मात्र, पुण्यात ‘भाई’ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चक्क येरवडा जेलबाहेर फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
खून, मारामारी अशा गंभीर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार आकाश कंचिले याचा वाढदिवसानिमित्त येरवडा जेल बाहेर त्याच्या समर्थक लोकांनी फटाक्याची आतषबाजी केली. एवढ्यावरच ते थांबले नाही तर या सेलिब्रेशनचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल देखील केला. या घटनेवरुन परिसरात भाईच्या टोळ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर आले आहे. गुन्हेगारांच्या वाढत्या टोळ्यांच्या संख्येवर पोलिसांनी नियंत्रण ठेवणे आवश्यक बनले आहे.
आरोपी आकाश कंचिले याच्यावर खून मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात येरवडा जेल मधून सुटलेल्या नितीन कसबे याचा शादल बाबा चौकात काही तासात आकाश आणि त्याच्या टोळीने अत्यंत निर्घृणपणे खून केला. या खुनाच्या गुन्ह्यात आकाश सध्या येरवडा जेलमध्ये आहे. येरवडा परिसरात अद्यापही त्याच्या समर्थकांची दहशत आहे. शुक्रवारी (दि.5) आकाशचा वाढदिवस होता. त्यामुळे त्याच्या समर्थकांनी एअरपोर्ट रस्त्यावर फटाक्याची आतषबाजी करुन वाढदिवस साजरा केला. तसेच याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले.
‘किंग ऑफ येरवडा’ व्हिडीओ व्हायरल
आकाश कंचिले याच्या समर्थकांनी ‘किंग ऑफ येरवडा’ असे इतर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले. यावरुन या भाई लोकांना आणि त्यांच्या समर्थकांना कोणाचीही भीती राहिली नाही हेच सिद्ध होते. आपल्या टोळीचे वर्चस्व दाखवण्यासाठी गुन्हाेगार आणि त्यांचे समर्थक सध्या सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याचे यावरुन समोर येत आहे. यामुळे सामान्य नागरिकांना दहशतीच्या वातावरणाखाली वावरावे लागत असल्याने पोलिसांनी या टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे सामान्य नागरिकांचे मत आहे.