बहुजननामा ऑनलाइन टीम – भारतात कोरोना प्रतिबंध लसीची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शासनाने लॉकडाऊनचे काही नियम शिथिल करून राज्यात हळूहळू शाळा, महाविद्यालये सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. परंतु केरळ येथील एक धक्कादायक माहिती पुढं आली आहे. शाळेमध्ये तब्बल १८७ विद्यार्थी आणि ७८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची घटना घडली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी, केरळमधील मलप्पूरमध्ये असलेल्या २ शाळांतील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पेरुंबडप्पू येथील मॅरन्चेरी गव्हर्नमेंट हायर सेकंडरी स्कूल आणि वॅनेरी हायर सेकंडरी स्कूलमधील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. रविवारी सर्वांचा कोरोना तपासणी अहवाल आला असून यामधील १८७ विद्यार्थी आणि ७८ स्टाफला कोरोना झाल्याचे समोर आले. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असे जिल्हा आरोग्य विभागाने सांगितले.
दरम्यान, कोरोना तपासणीनंतर आलेल्या अहवालात शाळेतील तीन शिक्षकांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली. त्यानंतर आरोग्य विभागाने शुक्रवारी शाळेतील ५८२ विद्यार्थी आणि ५० कर्मचाऱ्यांचे नमुने गोळा करुन कोरोना तपासणीसाठी पाठवले. तपासणी अहवालामध्ये यामधील १४८ विद्यार्थी आणि ५० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तसेच आरोग्य विभागाने यानंतर खबरदारी म्हणून जवळच्या व्हॅनेरी हायर सेकंडरी स्कूलमधील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचे कोरोना तपासणीसाठी नमुने गोळा केले. यामधील ४९ विद्यार्थी आणि ३९ कर्मचाऱ्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला.
तेथील जिल्हा वैद्यकीय अधिकारी के. सकीना यांनी सांगितले की, ‘या दोन शाळा आणि आजूबाजूच्या परिसरात कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी आरोग्य विभागाने उपाययोजना केल्या आहेत. कोरोनाची लागण झालेले शाळेतील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांच्या कोरोना तपासण्या लवकरच करण्यात येतील. तसेच ही घटना समोर आल्यानंतर विरोधी पक्षांनी राज्य सरकार आणि आरोग्य विभागाला धारेवर धरले आहे. ‘राज्य सरकारने प्रसिद्धीसाठी बनावट कोविड प्रतिबंधक मॉडेल तयार केले आहे. आता तरी त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना विषाणूपासून वाचवण्यासाठी योग्य ती उपाययोजना केली पाहिजे.’, असे युवा काँग्रेसचे मलप्पुरमचे जिल्हाध्यक्ष शाजी पचेरी यांनी सांगितले आहे.