बेळगाव : वृत्तसंस्था – बेळगाव जिल्ह्यातील रायबागमध्ये एका महिलेवर भाजी मार्केटमध्ये अॅसिड हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रायबाग येथे शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. या घटनेत ही भाजी विक्रेती महिला ७० टक्क्यांहून अधिक भाजली असून तिची प्रकृती गंभीर आहे. तिला अधिक उपचारासाठी बेळगावला हलविण्यात आले आहे.
ही महिला रायबागमधील बाजारपेठेत भाजीपाला विक्रीचे काम करते. नेहमीप्रमाणे बाजारपेठेत ती भाजी विकण्यासाठी शुक्रवारी आली होती. यावेळी दुचाकीवरुन एक हल्लेखोर आला. त्याने आपल्याबरोबर आणलेली अॅसिडची बाटली या महिलेच्या अंगावर ओतली. त्यानंतर हल्लेखोर पळून गेला. अॅसिड हल्ल्यानंतर काही क्षण कोणाला काहीच समजले नाही. भाजल्यामुळे या महिलेने टाहो फोडला. तिच्या आवाजाने आजू बाजूचे लोक तिच्याकडे धावले. त्यांनी पाणी टाकून तिला वाचविण्याचा प्रयत्न केला.
अॅसिड हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी या महिलेला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर या महिलेला बेळगावला हलविण्यात आले आहे.